A A A A A
Bible Book List

अनुवाद 16 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

वल्हांडण सण

16 “अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले. परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे ‘संकटाची भाकर’ होय. त्याने तुम्हाला मिसरमधील संकटांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. तेव्हा या सात दिवसात देशभर कुणाच्याही घरी खमीर असता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो उजाडायाच्या आत खाऊन संपवून टाका.

“वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका. देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ हा सण आहे. परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. सहा दिवस खमीर विरहीत भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याप्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा.

सप्ताहांचा (किंवा पन्नासाव्या दिवसाचा) सण

“पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा. 10 मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा. 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, लेवी गावातील पांथस्थ, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या. 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नका. तेव्हा हे नियम न चुकता पाळा.

मंडपाचा सण

13 “खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा. 14 हा सणही मुलंबाळं, नोकरचाकर, लेवी, शहरातील वाटसरु, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा. 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टि आहे. तेव्हा आनंदात राहा.

16 “तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे. 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे.

लोकांसाठी न्यायाधीश व अधिकारी

18 “तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे. 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात. 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करुन तेथे तुम्ही सुखाने राहाल.

परमेश्वर मूर्तीचा तिरस्कार करतो

21 “जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका. 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes