A A A A A
Bible Book List

अनुवाद 15 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

कर्जमाफीचे ठराविक वर्ष

15 “दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करुन टाकावे. त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करुन टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. परक्याकडून वसुली करावी, पण इस्राएलाला कर्जमाफी द्यावी. तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हाला परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देणार आहे पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांवर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.

“तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या या देशात एखादा माणूस गरीब असेल, त्याला मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.

“कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा मतलबी विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल.

10 “तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंतःकरणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल. 11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.

दासांची सुटका

12 “एखादी इब्री बाई किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्याला मुक्त करा. 13 पण त्याला रिक्त हस्ताने जाऊ देऊ नका. 14 त्याला आपल्यातील काही गुरं, धान्यधुन्य, द्राक्षारस द्या. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरभरुन मिळाले आहे. तेव्हा तुमच्या दासालाही सढळ हाताने द्या. 15 आपणही मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हाला आज ही आज्ञा देत आहे.

16 “तुमच्या कुटुंबाचा लळा लागल्यामुळे आणि आनंदात असल्यामुळे तुमचा एखादा दास तुम्हाला सोडून जायला तयार होणार नाही. 17 तेव्हा दरवाजा जवळ धरुन आरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.

18 “दासांना मुक्त करुन जाऊ देताना तुम्हाला जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हाला द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षांत ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यात देव तुम्हाला आशीर्वाद देईल.

पहिला गोऱ्हा याबद्दलचे नियम

19 “तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वराला अर्पण करा. पहिल्या गोऱ्हा याला कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरु नका. 20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियां समवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.

21 “पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बळी देऊ नका. 22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. 23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes