Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

अदोनीयाची राजा होण्याची इच्छा

आता राजा दावीद फार वृध्द झाला होता, वयोमानामुळे त्याला गारठा सहन होईना, नोकरांनी कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येईना. तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो, ती तुमच्या निकट झोपेल आणि तुम्हाला ऊब देईल.” आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलभर सुंदर तरुण मुलींचा शोध सुरु केला, तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची मुलगी सापडली, त्यांनी तिला राजाकडे आणले. ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.

अदोनीया हा दावीद आणि त्यांची पत्नी हग्गीथ यांचा मुलगा, गर्वाने फुगून जाऊन त्याने स्वतः राजा व्हायचे ठरवले. राजा व्हायच्या प्रबळ इच्छेने त्याने स्वतःसाठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे तयार केली. अदोनीया हा दिसायला सुंदर होता. अबशालोम पेक्षा हा धाकटा. पण राजा दावीदने मात्र अदोनीयाला “हे तू काय चालवले आहेस?” म्हणून कधी समज दिली नाही.

सरुवेचा मुलगा यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्याला नवीन राजा करण्यात मदत करायचे त्यांनी ठरविले. पण पुष्कळांना अदोनीयाच्या या हालचाली पसंत नव्हत्या. ते दावीदशी एकनिष्ठ राहिले. सादोक हा याजक, यहोयादाचा मुलगा बनाया, नाथान हा संदेष्टा, शिमी रेई आणि दावीदच्या पदरी असलेले वीर हे ते लोक होत. ते राजाच्याच बाजूला राहिले, हे लोक अदोनीयाला मिळाले नाहीत.

एकदा एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेढरे, गुरे, पुष्ट वासरे यांचा शांत्यर्पण म्हणून यज्ञ केला. आपले भाऊ, राजाची इतर मुले आणि यहूदातील सर्व अधिकारी यांना बोलावणे पाठवले,10 पण राजाच्या पदरचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना मात्र वगळले.

शलमोनासाठी नाथान व बथशेबा मध्यस्ती करतात

11 नाथान संदेष्ट्यांच्या हे कानावर गेले तेव्हा तो शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. त्याने तिला विचारले, “हग्गीथेचा मुलगा अदोनीया याचे काय चालले आहे याचा तुला पत्ता आहे का? त्याने स्वतःला राजा म्हणून घोषित केले आहे आणि इकडे आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही. 12 तू आणि तुझा मुलगा शलमोन यांच्या जिवाला धोका पोहोंचू शकतो. यातून वाचायचा मार्ग मी तुला दाखवतो, 13 अशीच राजा दावीदकडे जा आणि त्याला सांग, ‘स्वामी तुम्ही मला वचन दिले आहे. त्याप्रमाणे माझा मुलगा शलमोन तुमच्यानंतर गादीवर बसेल पण अदोनीया राजा होत आहे हे कसे काय?’ 14 तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन. तू तिथून निघून गेल्यावर मी राजाला सर्व हकीगत सांगीन. म्हणजे तू बोललीस त्यात तथ्य आहे हे राजाला पटेल.”

15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या शयनगृहात गेली, राजा फारच थकला होता. शुनेमची अबीशग त्याची सेवा करत होती. 16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजाने तिची चौकशी केली.

17 बथशेबा त्याला म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे. ‘माझ्यानंतर शलमोन राजा होईल. तो या गादीवर बसेल’ असे तुम्ही म्हणाला आहात. 18 आता तुमच्या नकळत अदोनीया स्वतःच राजा व्हायच्या खटपटीत आहे. 19 त्याने अनेक गुरे आणि उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे. त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुळे, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे, पण तुमचा एकनिष्ठ पुत्र शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही. 20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वतःनंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत. 21 आपण प्राण सोडण्यापूर्वी नीट व्यवस्था केली पाहिजे. तसे तुम्ही केले नाहीत तर तुमचे आपल्याच वाडवडीलांच्या शेजारी दफन झाल्यावर मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”

22 बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला. 23 राजाच्या सेवकांनी त्याच्या आगमनाची राजाला वर्दी दिली, “तेव्हा नाथान राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले.” 24 मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आता राज्य अदोनीयाचे आहे असे तुम्ही ठरवले आहे काय? 25 कारण आजच त्याने खाली खोऱ्यात जाऊन गुरे मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमची मुले, सेनापती, अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत. ‘राजा अदोनीया चिरायु होवो’ म्हणून घोषणा देत आहेत. 26 पण मी, सादोक याजक यहोयादाचा मुलगा बनाया आणि तुमचा मुलगा शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही. 27 माझे स्वामी, राजाने आम्हाला विश्वासात न घेता हे सर्व केले आहे का? आपला वारस तुम्ही कृपा करुन जाहीर करा.”

28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला आत यायला सांगा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर आली.

29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो. 30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राजा होईल. या सिंहासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. मी दिलेला शब्द खरा करीन.”

31 बथशेबाने हे ऐकून राजाला वंदन केले व म्हणाली “राजा चिरायु होवो.”

32 मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा मुलगा बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले. 33 राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा. 34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याला इस्राएलचा नवा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की शलमोन हा आता नवा राजा आहे. 35 मग त्याला घेऊन माझ्याकडे या, तो या सिंहासनावर बसेल आणि नवा राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा राजा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.”

36 यहोयादाचा मुलगा बनाया राजाला म्हणाला, “आमेन! स्वामी, खुद्द परमेश्वर देवच याला मान्यता देईल. 37 महाराज, आपल्याला परमेश्वराची साथ आहे. तो परमेश्वर असाच शलमोनाच्याही पाठीशी उभा राहील अशी मला आशा आहे. राजा शलमोनाच्या राज्याची भरभराट होवो आणि माझे स्वामी, आपल्यापेक्षा ते अधिक बळकट होवो.”

38 सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले. 39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने सादोकने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला. 40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांना उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.

41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”

42 यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “अरे तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”

43 पण योनाथान म्हणाला, “नाही, तुम्हाला ही बातमी चांगली वाटणार नाही. राजा दावीदाने शलमोनाला राजा केले आहे. 44 दावीदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया आणि आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले, त्यांनी शलमोनाला खुद्द राजाच्या खेचरावर बसवले. 45 मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहाने झऱ्याजवळ शलमोनाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण नगरात परतले. लोक त्यांच्या मागोमाग गेले. नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे. 46 शलमोन आता गादीवर बसला आहे. 47 राजाचा सेवकवर्ग दावीदाचे अभिनंदन करत आहे. ते म्हणत आहेत, ‘राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाला दावीदापेक्षाही किर्तिवंत करो. त्याच्या राज्याची दावीदापेक्षाही भरभराट होवो.’ दावीद राजा तेथे जातीने हजर होता. पलंगावरच तो वाकून अभिवादन करत होता. 48 आणि म्हणत होता, ‘इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान करा. परमेश्वराने माझ्या मुलांपैकीच एकाला सिंहासनावर बसवले आणि माझ्या डोळ्यादेखत हे झाले.’”

49 हे ऐकून अदोनीयाची पाहुणेमंडळी घाबरली आणि त्यांनी तिथून पळ काढला. 50 अदोनीयाही शलमोन काय करील या धास्तीने घाबरला. तात्काळ तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे घटृ पकडून बसला. [a] 51 कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही. ‘शलमोन राजाने मला अभय द्यावे’ असे तो म्हणत आहे.”

52 तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसालाही इजा होणार नाही. पण त्याने आगळीक केल्यास त्याची गय केली जाणार नाही. तो मरण पावेल.” 53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले. ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.

Notas al pie

  1. 1 राजे 1:50 तात्काळतो … बसला दयेची याचना करत बसणे. आपले निरपराधित्व सिध्द करायला, पवित्र स्थानाजवळ जाऊन वेदीचे कोपरे धरुन बसल्यास त्याला शिक्षा होत नसे.