Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत?
    ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी
    आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू
    आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”

परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा
    त्या लोकांना हसतो.
5-6 देव रागावला आहे आणि तो
    त्या लोकांनाच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली
तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.”
    यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.

आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो
परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो!
    आणि तू माझा मुलगा झालास.
जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन
    या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा [a] नाश करते
    तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील.”

10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा
    राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा.
    तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात.
पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
    तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

Notas al pie

  1. स्तोत्रसंहिता 2:9 लोखंडाची … भांड्याचा किंवा तू त्यांची लोखंडी कांबीने काळजी घेशील. तू त्यांना मातीच्या भांड्याप्रमाणे फोडशील.