Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

प्रमुख गायकासाठी शेमीनिथ सुरावरचे दावीदाचे स्तोत्र.

12 परमेश्वरा, मला वाचव!
    सर्व चांगले लोक आता गेले आहेत.
    आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही.
लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात.
    प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो.
परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओठ कापून टाकले पाहिजेत
    परमेश्वराने मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या जीभा छाटून टाकल्या पाहिजेत.
ते लोक म्हणतात, “आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ
कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून
    आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही.”

परंतु परमेश्वर म्हणतो, “वाईट लोक गरीबांकडून वस्तू चोरतात ते
    अगतिक लोकांकडून वस्तू काढून घेतात.
परंतु आता मी तिथे उभा राहून त्या गरीब असहाय्य लोकांची बाजू घेईन
    आणि त्यांचे रक्षण करीन.”

परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत.
    ते अग्नीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.
    ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.

परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे.
    त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर.
ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत.
    ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्त [a] असतात.

Notas al pie

  1. स्तोत्रसंहिता 12:8 ते … स्वस्त शब्दश: “दुष्ट लोक माणसाजवळच्या क्षुद्र वस्तूप्रमाणे ऐट दाखवतात.”