Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

गुंडाळी उघडण्यास कोण पात्र आहे?

मग मी, जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते. आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती. आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.?” परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडण्यास आणि त्यामध्ये पाहण्यास समर्थ नव्हता. मी खूप रडलो कारण ती गुंडाळी उघडून आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या योग्यतेचे कोणीही नव्हते. पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”

मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला व त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मी पाहिले. व वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते. कोकरा आला आणि त्याने जो, सिंहासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या. आणि त्यांनी नवे गाणे गाईले:

“तू गुंडाळी घेण्यास
    आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस,
कारण तुला वधण्यात आले
    आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना
    प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्टांतून विकत घेतले.
10 तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले
    आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील.”

11 मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती. 12 देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,

“जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य,
    संपत्ति, शहाणपण आणि शक्ति,
सन्मान, गौरव
    आणि स्तुतीस पात्र आहे!”

13 प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की,

“जो सिंहासनावर बसतो त्याला
    व कोकऱ्याला स्तुति, सन्मान, गौरव
    आणि सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असो!”

14 चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्याला अभिवादन केले.