Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

नहेम्याची प्रार्थना

नहेम्या हा हखल्याचा मुलगा. त्याची ही वचने: किसलेव महिन्यात मी, नहेम्या, शूरान या राजधानीत होतो. राजा अर्तहशश्तच्या कारदीर्चीचे तेव्हा विसावे वर्ष होते. मी शूशन येथे असताना माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहुदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे राहणाऱ्या यहुद्यांची चौकशी केली. हे युहदी म्हणजे बंदिवासातून सुटून अजून यहुदातच राहणारे लोक होते. यरुशलेम नगराचीही खुशाली मी त्यांना विचारली.

हनानी आणि त्याच्या बरोबरचे लोक म्हणाले, “नहेम्या, बंदिवासातून सुटून यहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत. त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे. कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे. तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”

यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली:

“हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू मोठा सर्वशक्तीमान देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांशी केलेला प्रेमाचा करार पाळणारा तू परमेश्वर आहेस.

“तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपा करून डोळे आणि कान उघडे कर व ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलींच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएलींनी तुझ्याविरुध्द जी पापे केली त्यांची मी कबुली देत आहे. मी कबुल करतो की मी तुझ्याविरुध्द पाप केले तसेच माझ्या वडीलांच्या घराण्यातील लोकांनीही केले. आम्हा इस्राएलींची वर्तणूक तुझ्या दृष्टीने वाईट होती. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.

“आपला सेवक मोशे याला दिलेली शिकवण तू कृपया आठव. त्याला तू म्हणाला होतास, ‘तुम्ही इस्राएल लोक एकनिष्ठ राहिला नाहीत तर दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला विखरुन टाकीन. पण तुम्ही माझ्याकडे परत आलात आणि माझ्या आज्ञा पाळल्यात तर मी असे करीनः आपापली घरे बळजबरीने सोडायला लागून पृथ्वीच्या अंतापर्यंत देशोधडीला लागलेल्या तुमच्यातल्या लोकांनाही मी ठिकठिकाणांहून एकत्र आणीन. माझे नाव ठेवावे म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.’

10 “इस्राएल लोक तुझे सेवक असून ते तुझे लोक आहे. तुझ्या प्रचंड सामर्थ्याने तू या लोकांना सोडवलेस. 11 तेव्हा, हे परमेश्वरा, माझी विनवणी कृपा करुन ऐक. मी तुझा सेवक आहे. तुझ्या नावाविषयी भीतियुक्त आदर दाखवण्याची इच्छा असलेल्या तुझ्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐकावीस. मी राजाचा मद्य चाखणारा सेवक [a] आहे, हे परमेश्वरा, तुला हे माहीत आहेच. तेव्हा कृपा करून आज माझ्या मदतीला ये. राजाजवळ मी मदतीची याचना करीन तेव्हा मला साहाय्य कर. मला यश दे आणि राजाची मर्जी राखण्यात मला मदत कर.”

Notas al pie

  1. नहेम्या 1:11 राजाचा मद्य चाखणारा सेवक एक महच्वाचे पद हा सेवक कायम राजाच्या अगदी निकट असून तो कोणी राजावर विषप्रयोग करत नाही ना याची खात्री करण्यासाठी राजाचे मद्य आधी चाखून बघतो.