Add parallel Print Page Options

धार्मिक माणूस ईयोब

ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला व श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे. ईयोबला सात मुले आणि तीन मुली होत्या. ईयोब जवळ 7,000 मेंढ्या, 3,000 उंट, 1,000 बैल आणि 500 गाढवी होत्या,तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशांतील तो सर्वात श्रीमंत माणूस होता.

ईयोबाची मुले आळीपाळीने आपापल्या घरांत भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलावीत असत. मुलांच्या भोजन समारंभानंतरच्या सकाळी ईयोब सर्वांत आधी उठून प्रत्येक मुलासाठी होमार्पणे करीत असे. तो म्हणे. “कदाचित् भोजन समारंभाच्यावेळी माझ्या मुलांनी निष्काळजीपणाने पाप केले असेल.” आपली मुलं देवाची उपासना करायला योग्य व्हावीत म्हणून ईयोब असे करीत असे.

नंतर एके दिवशी देवपुत्र (देवदूत) परमेश्वराला भेटायला आहे. त्यांच्याबरोबर सैतानही होता. परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?”

सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”

मग परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोबाला पाहिलेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कुणीही नाही. तो खरोखरच फार चांगला सात्विक माणूस आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो.”

सैतानाने उत्तर दिले, “होय, पण त्याच्याजवळ देवाची भक्ती करण्यामागे सबळ कारण आहे. 10 तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे. 11 पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.”

12 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला. “बरं आहे, तू त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंचे काहीही करु शकतोस. पण तू त्याच्या अंगाला मात्र हात लावायचा नाहीस.”

मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.

Read full chapter