A A A A A
Bible Book List

2 शमुवेल 21 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

शौलाच्या कुटुंबीयांना शासन

21 दावीदाच्या या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला. तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी (रक्तपिपासू) घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.” (गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत. ते अमोरी होत. इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. [a] तरी शौलने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले.)

गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले. दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्या साठी मी काय करु? इस्राएलचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करु शकतो?”

तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हाला हक्क नाही.”

दावीद म्हणाला, “ठीक तर, तुमच्यासाठी मी आता काय करावे?”

ते राजाला म्हणाले, “त्या माणसाने (शौलने) आमच्याविरुद्ध कट केला. इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा त्याने नि:पात करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौलची सात मुले आमच्या हवाली कर. शौलला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. तेव्हा शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.”

राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.” पण योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलचा मुलगा. पण दावीदाने त्याला त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे वचन दिले होते. म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही. अरमोनी आणि मफीबोशेथ (हा मफीबोशेथ वेगळा) ही शौलाला रिस्पा या पत्नीपासून झालेली मुले. शौलला मखिल नावाची मुलगीही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्यचा हा मुलगा. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली. या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले. त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो (वसंतातील) काळ होता.

दावीद आणि रिस्पा

10 अय्याची मुलगी रिस्पा हिने शोकाकुलहोऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसाला सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.

11 शौलाची दासी रिस्पा काय करत आहे हे लोकांनी दावीदाच्या कानावर घातले. 12 तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या (शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथशान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरुन नेली.) 13 याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले. 14 शौल आणि योनाथानच्या अस्थी त्यांनी बन्यामीनच्या प्रदेशात पुरल्या. शौलचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या. राजाच्या आज्ञेबरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.

पलिष्ट्यांशी युध्द

15 पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले. तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला. 16 त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य माणूस होता. त्याच्या भाल्याचे वजनच साडेसात पौंड होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला. 17 पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले.

तेव्हा दावीद बरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले “तुम्ही आता लढाईवर यायचे नाही. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”

18 यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.

19 गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता.

20 गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा बोटे होती. म्हणजे एकंदर चोवीस. हाही रेफाई वंशातला होता. 21 त्याने इस्राएलला आव्हान दिले पण योनाथानने या माणसाचे प्राण घेतले. (हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.)

22 ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.

Footnotes:

  1. 2 शमुवेल 21:2 इस्राएल लोकांना … दिले होते गिबोन्यांनी इस्राएल लोकांना फसवले, तेव्हाची यहोशवाच्या वेळची ही गोष्ट आहे. पाहा यहोशवा 9:3-15.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes