A A A A A
Bible Book List

2 शमुवेल 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दावीदाची युध्दाची तयारी

18 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार माणसांवर अधिकारी, सरदार नेमले. सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय (यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा) आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली.

तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, “मी ही तुमच्याबरोबर येतो.”

पण लोक म्हणाले, “नाही, तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांना त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात राहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला यालच.”

तेव्हा राजा लोकांना म्हणाला, “मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन.”

राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.

यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली, “माझ्या साठी एक करा. अबशालोमशी सौम्यपणाने वागा.” राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.

दावीदाच्या सैन्याकडून अबशालोमच्या सैन्याचा पराभव

अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमच्या अरण्यात ते लढले. दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली. देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मेली.

अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला तेव्हा अबशालोम बसून निसटायचा प्रयत्न करु लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.

10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, “अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.”

11 यवाब त्या माणसाला म्हणाला, “मग तू त्याचा वध करुन त्याला जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुदा आणि एक पट्टा इनाम दिला असता.”

12 तो माणूस म्हणाला, “तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, ‘लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.’ 13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते. आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.”

14 यवाब म्हणाला, “इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही.”

अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले. 15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.

16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांना अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले. 17 यवाबाच्या माणसांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. वर दगडांची रास रचून तो खंदक भरुन टाकला.

अबशालोमबरोबर आलेल्या इस्राएलानी पळ काढला आणि ते घरी परतले.

18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला मुलगा नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वतःचेच नाव दिले होते. आजही तो “अबशालोम स्मृतिस्तंभ” म्हणून ओळखला जातो.

यवाब दावीदाकडे हे वृत्त पाठवतो

19 सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला, “मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.”

20 यवाब त्याला म्हणाला, “आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा मुलगा मरण पावला आहे.”

21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.”

त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.

22 सादोकचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली “काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे.”

यवाब म्हणाला, “मुला. तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.”

23 अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.”

तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली.

अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.

दावीद बातमी ऐकतो

24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला. 25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले.

राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.”

धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच 26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, “तो पाहा, आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय.”

तेव्हा राजा म्हणाला, “तो ही बातमी आणतोय.”

27 पहारेकरी म्हणाला, “पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते.”

राजा म्हणाला, “अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार”

28 अहीमासने “सर्व कुशाल असो” असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, “देव परमेश्वराला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”

29 राजाने विचारले, “अबशालोमचे कुशल आहे ना?”

अहीमास म्हणाला, “यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.”

30 राजाने मग त्याला बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.

31 मग तो कूशी आला तो म्हणाला, “माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.”

32 राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?”

त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणसा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”

33 (यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले) तो फार शोकाकुल झाला. वेशीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्याला रडू कोसळले. आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या मुला, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते रे पोरा!”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes