A A A A A
Bible Book List

2 शमुवेल 12 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नाथान दावीदाशी बोलतो

12 परमेश्वराने नाथानला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, “एका नगरात दोन माणसे होती. एक श्रीमंत होता आणि एक गरीब. श्रीमंत माणसाकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती. पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब माणसाच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली. त्याच्याच अन्नातला घास ती खाई, त्याच्याच कपातले पाणी ती पिई. त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे. त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.

“एकदा एक प्रवासी श्रीमंत माणसाकडे आला. त्या प्रवाश्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत माणसाची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्याला काही काढून घ्यायचे नव्हते. तेव्हा त्याने त्या गरीब माणसाची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या प्रवाश्यासाठी अन्न शिजवले.”

दावीदाला या श्रीमंत माणसाचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत. कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्याला दया आली नाही.”

नाथान दावीदाला त्याच्या पापाबद्दल सांगतो

तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला. तुला शौलापासून वाचवले. त्याचे घरदार आणि बायका तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो. असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस आणि त्याच्या बायकोचा स्वतःची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास. 10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.’

11 “परमेश्वर म्हणतो, ‘आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या बायका तुझ्यापासून मी हिरावून घेऊन त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायका बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल. 12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलां देखत होईल.’”

13 मग दावीद नाथानला म्हणाला, “माझ्याहातून परमेश्वराचा मोठाच अपराध घडला आहे.”

नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने हा तुझा अपराध पोटात घातला आहे. तू मरणार नाहीस. 14 पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठेच निमित्त दिलेस. तेव्हा हा तुझा मुलगा मरेल.”

दावीद आणि बथशेबा यांच्या मुलाचा मृत्यू

15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला. 16 दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.

17 घरातील वडीलधाऱ्या माणसांनी येऊन दावीदाला जमिनीवरुन उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तिथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला. 18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, “मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे. मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करुन घेईल.”

19 पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली. त्यावरुन मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, “मूल गेले का?”

नोकरांनी “होय” म्हणून उत्तर दिले.

20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्याला वाढले आणि तो जेवला.

21 दावीदाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही असे का वागत आहात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात. शोक केलात पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.”

22 दावीदाने सांगितले, “मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला कारण मला वाटले, न जाणो, परमेश्वराला माझी दया येईल आणि बाळ जगेल 23 पण आता ते गेलेच तेव्हा आता मी कशासाठी उपास करु? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.”

शलमोनचा जन्म

24 दावीदाने मग आपली बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीर संबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराचा लोभ होता. 25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला नाथानने त्याचे नांव यदीद्या, म्हणजेच “देवाला प्रिय” असे ठेवले. देवाच्या वतीने नाथानने हे केले.

दावीद राब्बा काबीज करतो

26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करुन यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले. 27 यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला “राब्बाशी झुंज देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे. 28 आता इतर लोकांना एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या. मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल.”

29 दावीद मग सर्व लोकांना घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करुन त्याने त्याचा ताबा घेतला. 30 त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट [a] दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे पंचाहत्तर पौंड होते. त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली होती. तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.

31 राब्बा नगरातील लोकांनाही त्याने बाहेर नेले. त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला लावले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीटकामही करुन घेतले. सर्व आम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरुशलेमला परतला.

Footnotes:

  1. 2 शमुवेल 12:30 राजाच्या … मुकुट किंवा “मिल्कोमच्या मस्तकावरचा मुकुट” अम्नोनी लोकांचा मिलकोम हा देव होता.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes