A A A A A
Bible Book List

2 राजे 24 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

राजा नबुखदनेस्सर याची यहूदावर स्वारी

24 यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले. यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे जे घडेल म्हणून सांगितले होते त्याप्रमाणेच घडत होते. यूहदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.

यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसे व्हावे म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती. मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरुशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.

यहोयाकीमने बाकी जे काही केले त्याची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. यहोयाकीमच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.

मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरसोडून आला नाही.

नबुखदनेस्सर यरुशलेम बळकावतो

यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरुशलेमच्या एलनाथानची मुलगी. यहोयाखीनने आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.

10 यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरुशलेमला वेढा दिला. 11 नंतर नबुखद्नेस्सर या नगरात आला. 12 यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनची आई, त्याचे कार-भारी, वडीलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.

13 यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. राजा शलमोनने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.

14 नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही. 15 यहोयाखीनला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही त्याने नेले. हे सर्व त्याचे कैदी होते. 16 सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना त्याने बाबेलला कैदी म्हणून नेले.

राजा सिद्कीया

17 बाबेलच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले. 18 सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी. 19 सिद्कीया यहोयाखीनप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला. 20 तेव्हा परमेश्वराने संतापाने यरुशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes