A A A A A
Bible Book List

2 राजे 20 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

हिज्कीया मरणासन्न अवस्थेत

20 याच सुमारास हिज्कीया आजारी पडून जवळ जवळ मृत्युशय्येवरच होता. आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे गेला. तो हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तू आता घराच्या कारभाराची निरवानिरव करावीस कारण तू फार काळ जगणार नाहीस तुझा मृत्यू समीप आला आहे.’”

तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले. [a] परमेश्वराची प्रार्थना करुन तो म्हणाला,3 “परमेश्वरा, मी तुझी मनःपूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.

यशया मधला चौक ओलांडून जाण्यापूर्वीच पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, ‘तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तू करुणा भाकलीस ती मी ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वतःसाठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.’”

मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण [b] करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.”

तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करुन हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.

हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?”

यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ दे [c] की मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”

10 हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसं नको, ती दहा पावले मागे यावी.”

11 मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.

हिज्कीया आणि बाबेलचे लोक

12 यावेळी बलदानचा मुलगा बरोदख-बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे संदेश आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे ऐकून त्याने हे पाऊल उचलले. 13 हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या माणसांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तु दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही.

14 तेव्हा यशया संदेष्ट राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?”

हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.”

15 यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?”

हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.”

16 तेव्हा यशया म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक. 17 तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे. 18 बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.”

19 तेव्हा हिज्कीया यशायाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.” तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?”

20 शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. 21 हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.

Footnotes:

  1. 2 राजे 20:2 तेव्हा … वळवले ही भिंत बहुधा देवळाच्या दिशेला असावी.
  2. 2 राजे 20:7 अंजीराचे मिश्रण अंजीराचा हा औषधी उपयोग होता.
  3. 2 राजे 20:9 सावली … जाऊ दे हिज्कीयाने बांधलेले सूर्यघंटी यंत्र असावे. या इमारतीच्या पायऱ्यांवर ऊन पडले असता वेळ सांगता येत असावी.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes