A A A A A
Bible Book List

2 इतिहास 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

विवेकबुध्दीसाठी शलमोनाची प्रार्थना

परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.

शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला. मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सभामंडप तेथे होता. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो बनवला होता. दावीदाने परमेश्वराचा करारकोश किर्याथ यारीमाहून यरुशलेम येथे आणला होता. यरुशलेममध्ये तो ठेवण्यासाठी दावीदाने जागा तयार केली होती. करारकोशासाठी त्याने यरुशलेममध्ये तंबू उभारला होता. उरीचा मुलगा बसलेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती. म्हणून शलमोन आपल्या बरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला. परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने 1,000 होमार्पणे केली.

त्यारात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, “शलमोन, मी तुला काय द्यावे अशी तुझी इच्छा आहे ते मला माग.”

शलमोन परमेश्वराला म्हणाला, “माझे वडील दावीद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती. त्यांच्याजागी तू मला नवीन राजा म्हणून निवडलेस. आता, हे परमेश्वर देवा, त्यांना तू दिलेले वचन पूर्ण कर. एका फार मोठ्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस. त्यातील प्रजेची संख्या धरतीवरील रजःकणांसारखी विपुल आहे. 10 एवढ्या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे. तुझ्या मदतीखेरीज एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणालाच जमणार नाही.”

11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचा नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वतःसाठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. 12 तेव्हा ते मी तुला देईनच पण त्याखेरीज मालमत्ता, ऐश्वर्य आणि मानसन्मानही देईन. तुझ्या आधीच्या कोणाही राजाला मिळाले नसेल एवढी संपत्ती व मानसन्मान देईन. पुढेही तुझ्याएवढे कोणत्याही राजाला मिळणार नाही.”

13 तेथून शलमोन गिबोन येथे उच्चस्थानी गेला. सभामंडपाकडून तो पुन्हा राजाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी यरुशलेम येथे गेला.

शलमोनाचे सैन्यबल आणि संपत्ती

14 शलमोनाने सैन्यासाठी घोडे आणि रथ यांची जमवाजमव सुरु केली. त्याच्याकडे 1,400 रथ आणि 12,000 घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने पागा आणि रथांसाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले. काहींना त्याने आपल्याजवळ यरुशलेम येथेच ठेवून घेतले. 15 यरुशलेममध्ये त्याने चांदीसोन्याचा भरपूर साठा केला.सोने चांदी सामान्य दगडांसारखी विपुल होती तर गंधसरुचे लाकूड पश्चिमेकडच्या डोंगराळ भागात उंबराचे लाकूड असे तितके विपुल होते. 16 मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे आणवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोड्यांची खरेदी करत. 17 या व्यापाऱ्यांनी मिसरमधून 600 शेकेल चांदीला एकेक रथ आणि 150 शेकेल चांदीला घोडा या प्रमाणे ही खरेदी केली. हित्ती आणि अरामी राजांना मग ते हे रथ आणि घोडे विकत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes