A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

परमेश्वराची शमुवेलला हाक

लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.

एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”

पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”

शमुवेल झोपायला गेला. पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.

एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”

परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.

परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.

परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”

तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.

शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”

11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”

15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.

16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.

तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.

17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”

18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.

एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”

19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही. 20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली. 21 शिलोह येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes