A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 26 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दावीद आणि अबीशय शौलाच्या छावणीवर

26 जीफचे रहिवासी गिबा येथे शौलाला भेटायला गेले. त्याला ते म्हणाले, “यशीमोन जवळच्या हकीला डोंगरात दावीद लपून बसलेला आहे.”

शौल जीफच्या वाळवंटात गेला. त्याच्याबरोबर तेव्हा इस्राएलचे निवडक तीन हजाराचे सैन्य होते. दावीदचा त्या सर्वांनी जीफच्या वाळवंटात शोध घेतला. यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलाने तळ ठोकला.

दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलाच्या या पाठलागाचे वृत्त समजले. तेव्हा त्याने काही हेर नेमले. त्यांच्याकडून त्याला शौल हकीला येथे आल्याचे समजले. तेव्हा शौलच्या तळावरच तो गेला. शौल आणि अबनेर त्याला झोपलेले आढळले. (नेरचा मुलगा अबनेर हा शौलच्या सैन्याचा प्रमुख होता.) शौल मध्यभागी झोपलेला असून बाकी सर्वजण त्याच्याभोवती झोपलेले होते.

दावीद हित्ती, अहीमलेख, आणि सरुवेचा मुलगा अहीशय यांच्याशी बोलला. (अबीशय हा यवाबचा भाऊ). या दोघांना दावीदाने विचारले, “माझ्याबरोबर शौलाच्या तळावर यायला कोण तयार आहे”

अबीशय म्हणाला, “मी येतो.”

रात्र झाली दावीद आणि अबीशय छावणीवर पोचले. शौल मध्यभागी झोपलेला होता. त्याचा भाला उशाकडे जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि इतर सैनिक भोवताली झोपलेले होते. अबीशय दावीदला म्हणाला, “आज परमेश्वराने शुत्रला तुमच्या हवाली केले आहे. शौलच्याच भाल्याने मला त्याचा वध करु द्या. एकच वार मी करीन.”

पण दावीद त्याला म्हणाला, “त्याला ठार करु नको. परमेश्वराच्या अभिष्किक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव प्रायश्र्चित करील. 10 परमेश्वराच्या जीविताची शपथ, तोच शौलाला शासन करील. शौलाला नैसर्गिक मृत्यू येईल किंवा युध्दात मरण येईल. 11 पण परमेश्वराने निवडलेल्या राजाला मारायची वेळ परमेश्वर माझ्यावर आणणार नाही. तू फक्त त्याच्या उशाजवळचा भाला आणि पाण्याचा तांब्या उचल आणि मग आपण जाऊ”

12 तेवढा भाला आणि पाण्याचा तांब्या घेऊन दावीद आणि अबीशय छावणीबाहेर पडले. घडलेली गोष्ट कोणालाही समजली नाही. कोणी पाहिले नाही. कोणी जागे झाले नाही. परमेश्वरामुळेच सर्वजण गाढ झोपेच्या अमलाखाली होते.

दावीद शौलला पुन्हा शरमिंदे करतो

13 दावीद नंतर खोरे ओलांडून पलीकडे गेला. शौलच्या छावणी समोरच्या डोंगर माथ्यावर तो उभा राहिला. दावीद आणि शौल यांच्या छावण्यांमध्ये बरेच अंतर होते. 14 दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, ओ दे” असा पुकारा केला.

अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”

15 दावीद म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएल मध्ये तुझ्या तोडीचा दुसरा कोणी आहे का? मग तू आपल्या धन्याचे रक्षण कसे केले नाहीस? एक सामान्य माणूस तुमच्या छावणीत शिरतो, धन्याला, राजाला मारायला येतो. 16 आणि तुम्ही गाफील राहण्याची चूक करता. परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मृत्युदंडाला पात्र आहात. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला, तुमच्या स्वामीला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. शौलाच्या उशालगतचा भाला आणि पाण्याचा तांब्या याचा शोध घ्या बरे! कुठे आहेत या वस्तू?”

17 शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?”

दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.” 18 तो पुढे म्हणाला, “धनी, तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी काय केले? माझा अपराध कोणता? 19 राजेसाहेब, माझे ऐका. तुमच्या माझ्यावरील क्रोधाचे कारण परमेश्वर असेल तर तो माझ्या अर्पणाचा स्वीकार करील. पण माणसांनी तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवले असेल तर परमेश्वर त्यांचा सत्यानाश करो. या लोकांमुळेच मला परमेश्वराने दिलेल्या भूमीतून काढता पाय घ्यावा लागला. ‘दुसऱ्या कुठल्या परमेश्वराची उपासना कर, इथून चालता हो’ असे यांनीच मला सांगितले. 20 आता मरताना तरी परमेश्वराचे सान्निध्य मला लाभू द्या. इस्राएलचा राजा तर जणू क्षुल्लक पिसवेच्या शिकारीला निघालाय. डोंगरात तितराची पारध करतोय!” [a]

21 यावर शौल म्हणाला, “मी पापी आहे. तू परत ये. दावीद, माझ्या मुला, माझ्या जिवाचे तुला मोल वाटते हे तू तुझ्या कृतीतून आज दाखवले आहेस तेव्हा आता तुला मी उपद्रव देणार नाही. मी अविचाराने वागलो. फार मोठी चूक केली.”

22 दावीद त्याला म्हणाला, “हा राजाचा भाला इथे आहे. तुमच्यापैकी एखाद्या सेवकाने येऊन घेऊन जावा. 23 आपल्या करणीचे फळ परमेश्वर आपल्याला देतो. आपल्या योग्य वागण्याचे बक्षीस मिळते, तसंच चुकीचीही शिक्षा भोगावी लागाते. तुझा पराभव करायची संधी आज मला परमेश्वराने दिली होती. पण परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला मी इजा पोचू दिली नाही. 24 तुझ्या आयुष्याचे मला किती महत्व वाटते ते मी आज दाखवले. तसाच माझा जीव परमेश्वराला मोलाचा वाटतो हे तो दाखवून देईल. तो माझी संकटातून मुक्तता करील.”

25 तेव्हा दावीदला शौल म्हणाला, “देव तुझे कल्याण करो. दावीद, माझ्या मुला, तुझ्या हातून मोठी कार्ये होतील आणि तू यशस्वी होशील.”

मग दावीद आपल्या मार्गाने गेला आणि शौल स्वगृही आला.

Footnotes:

  1. 1 शमुवेल 26:20 डोंगरात तितराची पारध करतोय डोंगराळ भागात तितराची शिकार करताना त्या पक्षांची दमछाक होईपर्यंत पाठलाग करत असत. मग त्यांना मारत. शौलने दावीदचा असाच पाठलाग चालवला होता. येथे शब्दिक कोटीही अभिप्रेत आहे. “तितर” आणि “हाका मारणे” (23-14) यासाठी असलेल्या हिब्रू शब्दांमध्ये नादसाम्य आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes