A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 24 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दावीदाने शौलला लज्जित केले

24 शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग करुन त्यांना घालवल्यावर लोक त्याला म्हणाले, “दावीद एन गेदीजवळच्या वाळवंटात आहे.”

तेव्हा शौलने सर्व इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदाच्या शोधार्थ निघाला. रानबकऱ्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली. रस्त्यालगतच्या मेंढवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते. ते लोक दावीदला म्हणाले, “परमेश्वराने वर्तवलेला हाच तो दिवस. तो म्हणाला होता, ‘मी शत्रूला तुमच्या ताब्यात देईन मग तुम्ही त्याचे काहीही करा.’”

दावीद मग हळूच सरकत शौलजवळ पोचला. शौलच्या अंगरख्याचा एक तुकडा त्याने हळूच कापून घेतला. शौलने दावीदला पाहिले नाही. दावीदला नंतर आपल्या कृत्याबद्दल फार वाईट वाटले. तो आपल्या सोबत्यांना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्टी परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला राजा आहे. त्या अभिषिक्त राजाच्या विरुद्ध मी असे काही करता कामा नये.” आपल्या माणसांना थोपवण्यासाठी, त्यांनी शौलाला इजा करु नये म्हणून तो असे म्हणाला.

शौल गुहेतून बाहेर पडून चालायला लागला. दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलाला साद घातली, “महाराज, माझे स्वामी!”

शौलाने मागे वळून पाहिले. दावीदाने मान लववून त्याला अभिवादन केले. शौलला तो म्हणाला, “दावीद आपला घात करील असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता? 10 मी तुमच्या केसाला धक्का लावणार नाही. आता तुम्हीच पाहा. आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते. पण मी तुमची गय केली. तुमचा वध केला नाही. ‘हे माझे धनी आहेत शौल हा परमेश्वराचा अभिषिक्त राजा आहे. त्याला मी धक्का लावणार नाही’ असे मी म्हणालो. 11 हा तुकडा पाहा तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या. मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात. 12 परमेश्वरानेच याचा न्याय करावा. माझ्याशी तुम्ही असे वागलात याचे परमेश्वराने शासन खुशाल करावे. पण मी तुमच्या विरुद्ध लढणार नाही. 13 एक जुनी म्हण आहे:

‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’

“माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही. 14 तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाविरुद्ध इस्राएलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे? तुम्ही ज्याचा पाठलाग करताय तो तुमच्या वाईटावर नाही. हा तर निळळ मेलेल्या कुत्र्याचा किंवा पिसवेचा पाठलाग झाला. 15 परमेश्वरालाच या गोष्टीचा न्याय करु द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करु द्या. मला पठिंबा देवून माझेच खरे असल्याचे तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करील.”

16 दावीदचे बोलून झाले तेव्हा शौलने विचारले, “दावीद, माझ्या मुला, तुच हे बोलतो आहेस का?” शौलला रडू फुटले. तो हमसाहमशी रडला.

17 तो पुढे म्हणाला, “तुझे खरे आहे. माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास. पण मी मात्र वाईट वागलो. 18 तू काय चांगले केलेस ते आत्ता सांगितलेस. परमेश्वराने तुझ्यासमोर मला आणूनही तू मला मारले नाहीस. 19 मी तुझा शत्रू नव्हे हे यावरुन दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडल्यावर त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू माझ्याशी ज्या चांगुलपणाने वागलास त्याचे तुला देव चांगले फळ देईल. 20 तू आता राजा होणार आहेस हे मला माहीत आहे. तू इस्राएलवर राज्य करशील. 21 आता मला एक वचन दे. परमेश्वराची शपथ घेऊन तू माझ्या मुलाबाळांना मारणार नाहीस असे कबूल कर. माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस असे कबूल कर.”

22 तेव्हा दावीदाने त्याला तसे वचन दिले. शौलाच्या कुटुंबाचा संहार न करण्याचे कबूल केले. तेव्हा शौल घरी परतला. दावीद आणि त्याची माणसे गडावर परतली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes