A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दावीद आणि योनाथान यांची घनिष्ठ मैत्री

18 शौलाशी चाललेले दावीदाचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदावर तो स्वतःइतकेच प्रेम करु लागला. त्या दिवसापासून शौलाने दावीदला आपल्याजवळच ठेवून घेतले. त्याला तो आपल्या वडीलांकडे परत जाऊ देईना. योनाथानचे दावीदावर अपार प्रेम होते. त्याने दावीदाशी एक करार केला. योनाथानने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून दावीदला दिला. आपला गणवेष इतकेच नव्हे तर धनुष्य, तलवार कमरबंद हे ही दिले.

दावीदचे यश शौल पाहतो

शौलने मग दावीदला अनेक लढायांवर पाठवले. सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलाने दावीदला सेनापतिपद दिले. याने शौलच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण खूश झाले. दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले. त्या म्हणत,

“शौलाने हजार शत्रूंना ठार केले
    तर, दावीदाने लाखो मारले.”

या गीतामुळे शौलाची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारोंना मारतो असे या म्हणतात काय” तेव्हा पासून तो दावीदाकडे असूयेने आणि ईर्ष्येने पाहू लागला.

शौलला दावीदचे भय

10 दुसऱ्याच दिवशी शौला मध्ये दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल बेफाम होऊन बडबड करु लागला. दावीद तेव्हा नित्याप्रमाणे वीणा वाजवत होता. 11 शौलच्या हातात तेव्हा भाला होता. शौलला वाटले, “याला आपण भिंतीशी खिळवावे.” शौलने मग दोनदा भाला नेम धरुन मारला पण दोन्ही वेळा दावीद निसटला.

12 दावीदाला परमेश्वराची साथ होती. आणि शौलाचा त्याने त्याग केला होता. तेव्हा दावीदबद्दल शौलच्या मनात धास्ती होती. 13 शौलाने दावीदाला दूर पाठवले. हजार सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले. दावीदाने या सैन्याचे लढाईत नेतृत्व केले. 14 परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता. तेव्हा दावीदला सर्व ठिकाणी यश मिळाले. 15 जिकडे तिकडे त्याची सरशी होताना पाहून शौलाला दावीदची आणखीच धास्ती वाटू लागली. 16 पण इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांचे मात्र दावीदवर प्रेम होते. युध्दात त्यांच्या पुढे राहून त्यांच्यासाठी त्याने लढाया केल्यामुळे त्यांचा दावीदवर जीव होता.

आपल्या मुलीचे दावीदशी लग्न्न करुन देण्याची शौलची इच्छा

17 शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलाने एक योजना आखली. तो दावीदाला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्याशी लग्न कर. मग तू आणखीन सामर्थ्यवान होशील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलाचा विचार वेगळाच होता. “आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील” असा त्याचा बेत होता.

18 पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्हा मी राजकन्येशी कसा विवाह करु?”

19 त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्रीएलशी झाला.

20 शौलाची दुसरी मुलगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलाच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला.

21 त्याने विचार केला. “आता मीखलमुळे माझा बेत सफल होईल. तिचे लग्न मी दावीदाशी करुन देतो. मग पलिष्टी त्याचा वध करतील.” आणि दुसऱ्यांदा शौलाने दावीदाला लग्नाची अनुमती दिली.

22 शौलाने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.’”

23 शौलाच्या अधिकाऱ्यांनी दावीदाला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होणं सोपं आहे असं तुम्हाला वाटतं का? मी सामान्य, निर्धन माणूस, तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”

24 दावीदाचे मनोगत शौलाच्या अधिकाऱ्यांनी शौलाला सांगितले. 25 शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझ्याकडून हुंडा नको आहे. फक्त शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा तेवढ्या हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्टी दावीदाचा काटा काढतील असे त्याला वाटले.

26 अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदाला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली. 27 तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ट्यांवर चालून गेला. त्याने दोनशे [a] पलिष्ट्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वचा काढून दावीदाने त्या शौलाला दिल्या.

कारण राजाचा जावई व्हायचे त्याच्या मनात होते. 28 शौलाने दावीदाशी मीखलचे लग्न करुन दिले. दावीदला परमेश्वराची साथ आहे आणि आपल्या मुलीचे, मीखलचे, त्याच्यावर प्रेम आहे हे शौलच्या लक्षात आले. 29 तेव्हा तो मनातून आणखी धास्तावला. तो दावीदाला सतत पाण्यात पाहात होता.

30 पलिष्ट्यांचे सरदार सतत इस्राएलींवर चालून जात. पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. शौलाचा तो एक यशस्वी अधिकारी होता. त्यामुळे दावीदची ख्याती पसरली.

Footnotes:

  1. 1 शमुवेल 18:27 दोनशे प्राचीन ग्रीक अमुवादात “100” आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes