A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 17 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

गल्याथचे इस्राएलला आव्हान

17 पलिष्ट्यांनी आपापल्या सैन्यांची जमवाजमव केली आणि ते यहूदामधील सोखो येथ जमले. सोखो आणि अजेका यांच्यामध्ये अफसऱ्दम्मीन येथे त्यांनी छावणी दिली.

शौल आणि इस्राएलचे सैन्यही एकत्र आले. त्यांचा तळ एलाच्या खोऱ्यात होता. पलिष्ट्यांशी लढायला शौलचे सैन्य सज्ज झाले. खोऱ्याच्या दुतर्फा असलेल्या टेकड्यांवर ही दोन्ही सैन्ये समोरामसोर ठाकली होती.

पलिष्ट्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योध्दा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षा [a] जास्त होती. पलिष्ट्यांच्या छावणीतून तो बाहेर आला. पितळी शिरस्त्राण आणि खवल्या खवल्यांचे चिलखत त्याने परिधान केले होते. हे चिलखतही पितळी असून त्याचे वजन जवजवळ एकशेपंचवीस पौंड होते. त्याच्या पायांवरही पितळी कवच असून पाठीवर पितळी बरची होती. त्या बरचीचा लाकडी भाग विणकरच्या दांडक्याएवढा होता. आणि बरचीचं पातं पंधरा पौंड वजनाचं होतं एक ढाल वाहणारा सेवक गल्याथच्या समोर चालला होता.

गल्याथ रोज बाहेर पडे आणि इस्राएली सैनिकांना ओरडून आव्हान देई. तो म्हणे, “तुम्ही येथे येऊन युध्दासाठी का उभे आहात? तुम्ही शौलाचे सेवक आहात. मी पलिष्टी आहे. तुमच्यापैकी एकाला निवडा आणि माझ्याकडे पाठवा. त्याने मला मारले तर आम्ही पलिष्टी तुमचे दास बनू. पण मी त्याला मारले तर मी जिंकलो आणि मग तुम्ही आमचे दास व्हाल. तुम्हाला आमची चाकरी करावी लागेल.”

10 तो असेही म्हणे, “आज मी इस्राएल सैन्याला तुच्छ लेखतो. तुम्ही एकाला तरी पाठवा आणि आम्हाला लढू द्या.”

11 गल्याथची हे आव्हान ऐकून शौल व त्याचे सैन्य यांच्यात घबराट निर्माण झाली.

दावीद आघाडीवर जातो

12 यहूदातील बेथलहेम येथील इफ्राथ वंशामधल्या इशायचा दावीद हा मुलगा. इशायला एकंदर आठ मुलगे होते. शौलच्या कारकीर्दीत इशाय एक वयस्क गृहस्थ होता. 13 इशायचे तीन मोठे मलुगे शौलबरोबर युध्दाला गेले होते. पाहिला अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्मा. 14 दावीद सगळ्यात धाकटा होता. मोठी तीन मुलं शौलच्या सैन्यात असली तरी 15 दावीद अनेकदा बेथलहेमला आपल्या वडिलांची मेंढरं राखायला शौलकडून येत जात असे.

16 इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.

17 एक दिवस इशाय दावीदला म्हणाला, “आपल्या भावांसाठी एवढं टोपलंभर शिजवलेले धान्य आणि हे दहा पावाच्या लाद्या छावणीवर घेऊन जा. 18 तसंच, तुझ्या भावांच्या छावणीवरच्या हजारी अधिकाऱ्याला या पनीरच्या दहा वड्या दे. भावांची खुशाली विचार. ते सुखरुप आहेत याची पावती म्हणून माझ्यासाठी काहीतरी खूण आण. 19 तुझे भाऊ शौल आणि इतर इस्राएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ट्यांबरोबर त्यांची लढाई आहे.”

20 दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते. 21 इस्राएलचे सैन्य आणि पलिष्टी समोरासमोर उभे होते.

22 आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन. 23 त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.

24 गल्याथला पाहून इस्राएल सैनिकांनी भीतीने पळ काढला. 25 त्यातला एक इस्राएली म्हणाला, “बघितलंस त्याला? पाहून घे. हा गल्याथ पुन्हा पुन्हा येऊन इस्राएलची निर्भत्सना करतो. जो कोणी त्याला ठार करील त्याला शौल राजा भरपूर द्रव्य देईल. आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देईल. शिवाय इस्राएलमध्ये त्याचे घराणे स्वतंत्र करील.”

26 दावीदाने आपल्या आसपासच्या लोकांना विचारले, “काय म्हणाला तो? या पलिष्ट्याला ठार करुन इस्राएलवरचा कलंक पुसून टाकणाऱ्याला इनाम काय आहे? आणि हा गल्याथ तरी एवढा कोण? बोलूनचालून परका. [b] एक पलिष्टी आमच्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलतो म्हणजे काय?”

27 तेव्हा इस्राएली सैनिकांनी पुन्हा एकदा दावीदला इनाम काय ते सांगितले. 28 अलीयाबने दावीदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले. त्याला दावीदचा राग आला. अलीयाबने दावीदला रागाने विचारले, “तू इथे का आलास? आणि वाळवंटात आपळी मेंढरे कोणापाशी सोडून आलास? मला माहीत आहे तू इथे का आलास ते! तुला जे करायला सांगितले ते करायला नको. नुसती लढाई बघत बसायला आलास.”

29 दावीद म्हणाला, “माझं काय चुकलं? मी फक्त बोलत होतो.” 30 दावीदाने मग इतरांनाही तेच विचारले. पूर्वीसारखीच उत्तरे त्याला मिळाली.

31 काहींनी दावीदला बोलताना ऐकले. त्यांनी त्याला शौल कडे नेले आणि दावीदचे शब्द त्याच्या कानावर घातले. 32 दावीद शौलाला म्हणाला, “गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ट्याचा मी सामना करतो.”

33 शौल त्याला म्हणाला, “तू त्याला युध्दात पुढे पडू शकणार नाहीस. तू साधा सैनिकसुध्दा नाहीस. [c] गल्याथ तर लहानपणापासून लढाईवर जातो आहे.”

34 पण दावीद म्हणाला, “मी माझ्या वडिलांची शेरडे-मेंढरे राखतो. एकदा एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरु उचलून घेऊन गेले. 35 मी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर हल्ला करुन कोकराला त्याच्या तोंडातून सोडवले. त्या हिंस्त्र पशूंनी माझ्यावर झेप घेतली पण त्याच्या जबडयाखाली धरुन त्याला आपटून मी ठार केले. 36 सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. त्या परक्या गल्याथचीही मी तशीच गत करीन. आपल्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याची टर उडवतो. त्याला मृत्यूला सामोरे जायलाच पाहिजे. 37 परमेश्वराने मला सिंह आणि अस्वल यांच्या तावडीतून सोडवले. तो मला या पलिष्ट्यांच्या हातूनही सोडवील.”

तेव्हा शौल दावीदला म्हणाला, “ठीक तर! देव तुझे रक्षण करो.” 38 शौलाने आपली स्वतःची वस्त्रे दावीदला दिली. पितळी शिरस्त्राण आणि चिलखत त्याच्या अंगावर चढवले. 39 दावीदाने मग तलवार लावली आणि तो चालून पाहू लागला. पण त्याला हालचाल जमेना कारण त्याला अशा अवजड गोष्टींची सवय नव्हती.

तेव्हा तो म्हणाला, “हे सर्व चढवून मला लढता येणार नाही. याची मला सवय नाही.” आणि त्याने ते सगळे उतरवले. 40 एल काठी तेवढी हातात घेऊन तो वाहत्या झऱ्यातले गुळगुळीत गोटे शोधायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने पाच गोटे घेतले आणि हातात गोफण घेऊन तो गल्याथाच्या समाचाराला निघाला.

दावीद गल्याथला ठार करतो

41 गल्याथ हळू हळू पावले टाकत दावीद कडे येऊ लागला. गल्याथचा मदतनीस ढाल धरुन त्याच्या पुढे चालला होता. 42 दावीदकडे बघून गल्याथला हसू फुटले. हा देखणा, तांबूस वर्णाचा तरुण सैनिक नव्हे हे त्याच्या लक्षात आले. 43 तो दावीदला म्हणाला, “ही काठी कशाला? कुत्र्याला हाकलतात तसे मला हाकलणार आहेस की काय?” मग गल्याथने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. 44 दावीदला तो म्हणाला, “जवळ ये आज पक्ष्यांना आणि वन्य, प्राण्यांना तुझे मांस खाऊ घालतो.”

45 यावर दावीद त्या पलिष्टी गल्याथला म्हणाला, “तुझी तलवार, भाला-बरची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इस्राएलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस. 46 आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करुन टाकू. मग इस्राएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल. 47 लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हे परमेश्वराचे युध्द आहे. तुम्हा पलिष्ट्यांच्या पराभव करायला देव आमचा पाठिराखा आहे.”

48 गल्याथ तेव्हा दावीदवर हल्ला करायला सरसावला. संथपणे तो जवळ जवळ सरकू लागला. तेव्हा दावीद चपळपणे त्याला सामोरा गेला.

49 थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याबरोबर गल्याथच्या दोन डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.

50 अशा प्रकारे निवळ गोफण धोंड्याच्या साहाय्याने त्याने पलिष्ट्याला ठार केले. दावीदकडे तलवार नव्हती. 51 चपळाईने तो गल्याथच्या बाजूला जाऊन उभा राहिला. गल्याथचीच तलवार म्यानातून काढून त्याने त्याचे शिर धडावेगळे केले. पलिष्ट्याचा वध शेवटी असा झाला.

आपला खंदा वीर गतप्राण झाल्याचे पाहताच इतर पलिष्टे पळून गेले. 52 तेव्हा यहूदा आणि इस्राएलच्या सैनिकांनी गर्जना करत त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. गथच्या वेशीपर्यंत तसेच एक्रोनाच्या दिंडीदरवाजापर्यंत ते पाठलाग करत गेले. अनेक पलिष्ट्यांना त्यांनी ठार केले. शारईमच्या वाटेवर थेट गथ आणि एक्रोनपर्यंत त्यांचे मृतदेह विखुरलेले होते. 53 या पाठलागानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांच्या छावणीवर आले आणि छावणी लुटली.

54 दावीदाने या पलिष्ट्याचे शिर यरुशलेमला आणले आणि त्याची शस्त्रास्त्रे आपल्या तंबूत ठेवली.

शौलाला दावीदची धास्ती

55 शौलाने दावीदाला गल्याथाशी लढायला जाताना पाहिले आणि आबनेर या आपल्या सेनापतीला विचारले, “हा तरुण कोणाचा मुलगा?”

आबनेर म्हणाला, “मला काहीच कल्यना नाही, धनी.”

56 शौल राजा म्हणाला, “याच्या वडीलांचा ठावाठिकाणा शोधून काढा.”

57 गल्याथाला ठार करुन परत आल्यावर दावीदाला आबनेर ने शौलकडे नेले. गल्याथाचे मुंडके अजूनही दावीदाच्या हातातच होते.

58 शौलने त्याला विचारले, “तरुण मुला तुझे वडील कोण आहेत?”

दाविद म्हणाला, “बेथलहेम येथील आपला दास इशाय यांचा मी मुलगा.”

Footnotes:

  1. 1 शमुवेल 17:4 नऊ फूटापेक्षा शब्दश: हात व 1 स्पन प्राचीन ग्रीक भाषांतरात आणि एका हिब्रू लेखात हे “हे हात व 1 स्पन” किंवा 6 फूट नऊ इंच एवढे आहे.
  2. 1 शमुवेल 17:26 परका शब्दाश: अर्थ “सुंता न झालेला” त्यामुळे इस्राएलांबरोबर परमेश्वराने जो करार केला त्यात हा नव्हता म्हणून परका.
  3. 1 शमुवेल 17:33 सैनिकसुध्दा नाहीस किंवा “तू एक पोर आहेस” हिब्रूमध्ये पोर” चा अर्थ “सेवक” किंवा “सैनिकांची शस्त्रे घरणारा मदतनीस” असाही होतो.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes