A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 13 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

शौलाची पहिली चूक

13 आता शौलाला राजा होऊन वर्ष झाले होते. इस्राएलवरील त्याच्या सत्तेला दोन वर्षे झाल्यावर [a] त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.

गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.”

शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली. सर्व इस्राएलांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.”

सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला. इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ [b] आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.

आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला. काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.

शमुवेलने गिलगाल येथे भेटतो असे शौलाला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलाने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुवेल पोचला नाही. तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले. तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून द्या.” ती आणल्यावर शौलाने यज्ञार्पणे केली. 10 त्याचे हे आटोपते आहे तोच शमुवेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.

11 शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?”

शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली. 12 तेव्हा मी विचार केला, पलिष्टी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”

13 शमुवेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे ऐकले असतेस तर इस्राएलवर तुझ्या वंशाचे राज्य निरंतर राहिले असते. 14 पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुवेल गिलगाल सोडून चालता झाला.

मिखमाश येथे युद्ध

15 शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली. 16 आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ट्यांचा तळ होता. 17 त्यांनी त्या भागातील इस्राएल रहिवाश्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ट्यांच्या सैन्याच्या तीन तुकडया होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली. 18 दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आग्न्नेय दिशेला गेली आणि तिसरी टोळी वाळवंटाच्या दिशेला असलेल्या सबोईम दरी कडील वाटेने गेली.

19 इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती. 20 पलिष्टी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इस्राएलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी यांना धार लावायची असेल तेव्हा ते पलिष्ट्यांकडे जात. 21 फाळ आणि कुदळीला धार लावण्यासाठी पलिष्टी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुऱ्हाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता. 22 अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.

23 पलिष्टी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.

Footnotes:

  1. 1 शमुवेल 13:1 आता शौलला … वर्षे झाल्यावर दुसरा अर्थ असा, “शौल राजा झाला तेव्हा 1 वर्षाचा होता. त्याने 2 वर्षे राज्य केले” हिब्रूमधील हा भाग अर्थ लावण्याच्या दृष्टीने अतिशय अवघड आहे. कदाचित् यातील आकडे वेगळे असू शकतील. प्राचीन ग्रीक अनुवादात हा भाग नाही.
  2. 1 शमुवेल 13:5 तीन हजार रथ हिब्रू प्रमाणे “तीस हजार.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes