A A A A A
Bible Book List

1 शमुवेल 11 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

11 साधारण महिन्याभरानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबोश गिलादला वेढा दिला. तेव्हा याबेशाच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.

पण नाहाशने उत्तर दिले, “तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून इस्राएलची नाचक्की करीन तेव्हाच तुमच्याशी मी करार करीन.”

तेव्हा याबेशमधील वडीलधारी मंडळी त्याला म्हणाली, “आम्हाला सात दिवसाची मुदत दे. तेवढ्या वेळात आम्ही इस्राएलभर आमचा संदेश देऊन माणसे पाठवतो. आमचा बचाव करायला कोणीच आले नाही तर आम्ही आपण होऊन तुझ्या स्वाधीन होऊ.”

शौल याबोश-गिलादचे रक्षण करतो

शौल राहात होता तेथे म्हणजे गिबा येथे याबेशचे दूत येऊन पोचले. त्यांनी लोकांना हे सर्व सांगितले. तेव्हा लोकांनी रडून आकांत मांडला. शौल तेव्हा आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येतांना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?”

तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले. शौलने ते ऐकून घेतले. त्याच वेळी त्याच्यात देवाच्या आत्म्याचा संचार होऊन तो संतप्त झाला. त्याने एक बैलांची जोडी घेऊन तिचे तुकडे तुकडे केले आणि दूतांना ते इस्राएलच्या सर्व प्रांतात फिरवायला सांगितले. त्याचबरोबर ही दवंडी पिटायला सांगितली. “सर्वजण शौल आणि शमुवेल यांच्या पाठीशी राहा. यात हयगय झाल्यास त्याच्या गुरांचीही अशीच गत होईल.”

परमेश्वराच्या धास्तीने लोक एकदिलाने एकत्र आले. शौलने बेजेक येथे या सर्वांना एकत्र बोलावले. तेथे इस्राएल मधून तीन लाख आणि यहूदातून प्रत्येकी तीस हजार माणसे होती.

या सर्वांनी शौलाच्या सुरात सूर मिसळून याबेशच्या दूतांना सांगितले, “उद्या दुपारपर्यंत तुमच्या बचावासाठी आम्ही येत आहोत असे याबेश गिलाद मधील लोकांना सांगा.”

शौलचा हा निरोप दूतांनी पोचवल्यावर याबेशच्या लोकांमध्ये आनंदी आनंद झाला. 10 ते अम्मोनी राजा नाहाश याला म्हणाले, “उद्या आम्ही तुमच्याकडे येतो मग आमचे हवे ते कर.”

11 दुसऱ्या दिवशी सकाळी शौलने आपल्या सैन्याची तीन गटात विभागणी केली. त्यांच्यासह शौलने दिवस उजाडताच अम्मोन्यांच्या छावणीत प्रवेश केला. पहारा बदलत असताना त्यांच्यावर हल्ला केला. दुपार व्हायच्या आधीच अम्मोन्यांचा त्यांनी पराभव केला. अम्मोनी सैन्याची दाणादाण उडाली. ते वाट सापडेल तिकडे पळत सुटले. प्रत्येक जण वेगळ्या दिशेला गेला. कोणी दोन सैनिक एका ठिकाणी नव्हते.

12 एवढे झाल्यावर लोक शमुवेलाला म्हणाले, “शौलाला विरोध करणारे, त्याचे राज्य नको असलेले कुठे आहेत ते लोक? त्यांना आमच्या समोर आणा. त्यांनाही मारुन टाकतो.”

13 पण शौल म्हणाला, “नाही, आज कोणाचीही हत्या आता करायची नाही. परमेश्वराने इस्राएलला तारले आहे.”

14 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आता आपण सगळे गिलगाल येथे जाऊ. तेथे पुन्हा नव्याने शौलाला राजा म्हणून घोषित करु.”

15 त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासमोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासमोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इस्राएली यांनी उत्सव साजरा केला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes