A A A A A
Bible Book List

1 राजे 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

एलीया आणि बालचे संदेष्टे

18 लागोपाठ तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “अहाब राजाला जाऊन भेट मी लौकरच पाऊस पाडणार आहे.” तेव्हा एलीया अहाबला भेटायला गेला.

शोमरोनमध्ये तेव्हा अन्नधान्याचे दुर्भिक्ष्य होते. अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. (ओबद्या परमेश्वराचा खरा अनुयायी होता. एकदा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले. त्यांच्या अन्नपाण्याची तरतूद केली.) अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल आपण सगळ्या ओहोळझऱ्यांचा शोध घेऊ. आपली खेचरे, घोडी तग धरुन राहतील इतपत चारा शोधून काढू म्हणजे मग आपल्याला आपले पशू मारावे लागणार नाहीत.” त्या दोघांनी मग आपापसात पाहणी करायच्या प्रदेशाची वाटणी केली आणि सगळा प्रदेश पाण्यासाठी पायाखाली घातला. दोघेजण दोन वाटांनी गेले. ओबद्याला वाटेत एलीया भेटला. ओबद्याने त्याला ओळखून अभिवादन केले. ओबद्या त्याला म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”

एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या राजाला जाऊन सांग.”

तेव्हा ओबद्या म्हणाला, “तुमचा ठावठिकाणा मी अहाबला सांगितला तर तो मला मारुनच टाकील. मी आपला काही अपराध केला नाही, मग तुम्ही माझ्या जिवावर का उठलात? 10 परमेश्वर देवाशपथ, राजा सर्वत्र तुमचा शोध घेत आहे. त्यासाठी त्याने गावोगाव माणसे पाठवली आहेत. जेथे जेथे तुम्ही सापडला नाहीत असे कळले तिथे तिथे त्याने तिथल्या राजांना एलीया इथे नाही असे शपथेवर सांगायला सांगितले. 11 आणि आता तुम्ही मला म्हणता, जा त्याला जाऊन सांग म्हणून! 12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. मी लहानपणापासून देवाविषयी आदर बाळगून आहे. 13 मी काय केले ते तुम्हाला माहीत आहे ना? ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारायला निघाली होती तेव्हा मी एकेका गुहेत पन्नास असे शंभर संदेष्ट्यांना दोन गुहांमध्ये लपवले होते. त्यांना खायला प्यायला दिले. 14 आणि आता तुम्ही मला राजाला आपली खबर द्यायला सांगत आहात. तो नि:संशय मला मारणार!”

15 यावर एलीया त्याला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आज मी राजासमोर उभा राहाणार आहे, असे मी वचन देतो.”

16 तेव्हा ओबद्या राजाकडे गेला. त्याने अहाब राजाला एलीयाचा ठावठिकाणा सांगितला. राजा एलीयाला भेटण्यासाठी आला.

17 अहाबने एलीयाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला, “इस्राएलला त्रस्त करुन सोडणारा तूच का तो?”

18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही. ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे. परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरु झाला. 19 आता कर्मेल पर्वतावर समस्त इस्राएलींना जमायला सांग. बालच्या साडेचारशे संदेष्ट्यांनाही तेथे घेऊन ये. तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. ईजबेल राणीचा त्या संदेष्ट्यांना पाठिंबा आहे.”

20 तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबने कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले. 21 एलीया तेथे सर्वांसमोर आला आणि म्हणाला, “कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार? जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे. पण बाल खरा देव असेल तर त्याला तुम्ही अनुसरा.”

लोक यावर काहीच बोलले नाहीत. 22 तेव्हा एलीया म्हणाला, “परमेश्वराचा संदेष्टा असा इथे मी अगदी एकटाच आहे. दुसरा कोणीही नाही. पण बालचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत. 23 तेव्हा दोन गोऱ्हे आणा. बालच्या संदेष्ट्यांनी त्यातला एक घ्यावा. त्याला मारुन त्याचे तुकडे-तुकडे करावे. मग ते मांस लाकडे रचून त्यावर ठेवावे. विस्तव मात्र पेटवू नका. दुसऱ्या गोऱ्ह्याचे मी तसेच करीन. मीही विस्तव पेटवणार नाही. 24 तुम्ही बालचे संदेष्टे मिळून तुमच्या देवाची प्रार्थना करा. मी परमेश्वराची प्रार्थना करीन. ज्याच्या प्रार्थनेने विस्तव पेटेल तोच खरा देव.”

ही कल्पना सर्व लोकांना पटली.

25 मग एलीया बालच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा तुम्हीच आधी सुरुवात करा. एक गोऱ्हा निवडा आणि आपल्या देवाची नावे घ्यायला लागा. फक्त विस्तव लावू नका.”

26 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी एक गोऱ्हा घेतला आणि ते तयारीला लागले. दुपारपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली. “बाल आमच्या हाकेला ओ दे” अशी त्यांनी विनवणी केली. पण कसलाही आवाज आला नाही किंवा उत्तर दिले नाही. आपण रचलेल्या वेदीभोवती ते संदेष्टे नाचले तरी अग्नी काही प्रज्वलित झाला नाही.

27 दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरंच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादेवेळी प्रवासात किंवा झोपेत असेल. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करुन त्याला उठवा.” 28 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वतःवर वार करुन घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले. 29 दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते अंगात आल्यासारखे वागत राहिले. पण काहीही घडले नाही बालकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!

30 मग एलीया सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले. 31 त्याला बारा दगड मिळाले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबलाच परमेश्वराने “इस्राएल” या नावाने संबोधले होते. 32 परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गॅलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती. 33 एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले. 34 मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या लाकडांवर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. 35 वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.

36 दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. 37 हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वतःजवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”

38 तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. 39 सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.

40 एलीया म्हणाला, “त्या बालच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसूट देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.

पावसाचे आगमन

41 एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे.” 42 तेव्हा आहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यांत डोके घालून बसला. 43 आणि आपल्या बरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा.”

समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्याला पुन्हा जाऊन पाहायला सांगितले. असे सातवेळा झाले. 44 सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, “एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता.”

तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाही तर पावसामुळे त्याला थांबावे लागेल.”

45 पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला. 46 यावेळी एलीयात परमेश्वरी शक्ती संचारली. धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरुन घटृ खोचले आणि थेट इज्रेलपर्यंत तो अहाबच्या पुढे धावत गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes