A A A A A
Bible Book List

1 करिंथकरांस 15 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

ख्रिस्ताविषयीची सुवार्ता

15 आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात. आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. ज्या वचनाने मी तुम्हांस सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे.

कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे. व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले. व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत. नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.

कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. 10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती. 11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.

आम्हांला मेलेल्यांतून उठविण्यात येईल

12 पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे? 13 जर मृतांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, 14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. 15 आणि आम्हीसुद्धा देवाविषयीचे खोटे साक्षीदार ठरु कारण आम्ही देवासमोर शपथपूर्वक साक्ष दिली आहे की, ख्रिस्ताला मेलेल्यांतून त्याने उठविले, पण जसे ते म्हणतात त्याप्रमाणे जर देवाने ख्रिस्ताला उठविले नाही, तर मेलेले मरणातून उठविले जात नाहीत. 16 आणि जर मृतांना उठविले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही. 17 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे; तुम्ही अजूनसुद्धा पापातच आहात; 18 होय, आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत, त्यांचा नाश झाला आहे. 19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.

20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे. 21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. 22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले, 24 मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.

25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे. 26 शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे. 27 कारण “देवाने सर्व काही त्याच्या अधिकारात ठेवले आहे.” आता जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्व गोष्टी” अंकीत केल्या आहेत तेव्हा सर्व स्पष्ट आहे की, ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकीत केल्या आहेत, तो देव सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या अधिकार क्षेत्रात आहेत. 28 आणि सर्व गोष्टी जेव्हा स्वाधीन केलेल्या आहेत, तेव्हा पुत्रसुद्धा देवाच्या, ज्याने सर्व गोष्टी स्वाधीन केल्या आहेत, स्वतः स्वाधीन केला जाईल यासाठी की, देव सर्वांवर संपूर्णपणे अधिपती असावा.

29 नाहीतर, मेलेल्यांसाठी व त्यांची पुन्हा भेट होईल या आशेने ज्यांनी बाप्तिस्मा घेलला आहे ते काय करतील? जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?

30 आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो? 31 बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो 32 इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”

33 फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.” 34 शुद्धीवर या. जसे तुम्ही यायला पाहिजे आणि पाप करीत जाऊ नका. कारण तुम्हांपैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हांस लाजविण्यासाठी बोलतो.

आपले शरीर कोणत्या प्रकारचे असेल?

35 परंतु कोणीतरी म्हणेल? “मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?” 36 तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही. 37 आणि तू लावतोस (पेरतोस) त्यासंबंधी तू जे जमिनीत पेरतोस ते वाढलेले रोपटे नसून जे वाढतच राहणार आहे, ते नव्हे तर फक्त धान्य (दाणा). तो गव्हाचा किंवा इतर कोठला तरी असेल. 38 आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो. 39 जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते. प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते; आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते. 40 तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर जगिक शरीराला दुसरे असते. 41 सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते. आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो.

42 म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते आविनाशी आहे. 43 जे शरीर जमिनीत पुरले आहे, ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते 44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठविले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे.

जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. 46 परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. 47 पाहिला मनुष्य मातीतून आला म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. 48 ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. 49 ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपणसुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करु.

50 बंधूनो, मी तुम्हांला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसेव विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. 51 पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.

52 क्षणात, डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. 53 कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. 54 जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.

“विजयात मरण गिळले गेले आहे.”

55 “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे?
    मरण, तुझी नांगी कोठे आहे?”

56 मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमाशास्त्रापासून येते. 57 पण देवाला धन्यावाद असो, जो प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!

58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो, स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभुमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes