A A A A A
Bible Book List

1 करिंथकरांस 14 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मंडळीला मदत करण्यासाठी आध्यात्मिक दाने वापरा

14 प्रीतीसाठी प्रयत्न करा. आणि आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता माणसांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. आत्म्याच्या द्वारे तो गुढ गोष्टी बोलतो. परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती, उपदेश याविषयी बोलतो, ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करुन घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे (देवासाठी बोलण्याचे) दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.

आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल. जो संदेश देतो, (देवासाठी बोलतो) तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच (देवासाठी बोलणाऱ्यासारखाच) आहे, जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर, त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते.

आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का? हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल? आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?

त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल. 10 नि:संशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत, व कोणतीही अर्थविरहीत नाही. 11 म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल. 12 नेमके तेच तुम्हांलाही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवीत म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यत्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.

13 म्हणून, जो दुसऱ्या भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14 कारण जर मी दुसऱ्या भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझे मन रिकामे राहते. 15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धिनेही प्रार्थना करीन. 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही. 17 आता तू धन्यवाद देत असलास हे जरी चांगले असले तरी दुसरी व्यक्ति आध्यात्मिकदृष्ट्या बलवान झालेली नसते.

18 मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलू शकतो ज्याचे दान मला आहे, 19 परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.

20 बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. 21 नियमशास्त्र म्हणते,

“इतर भाषा बोलणाऱ्याचा
    उपयोग करुन,
मी या लोकांशी बोलेन
    तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.”

हे असे प्रभु म्हणतो.

22 म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वासणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. 23 म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का? 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; 25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”

तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी

26 बंधूनो, मग काय करावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, प्रत्येकाकडे गाण्यासाठी स्तोत्र असते कोणाकडे शिक्षण असते. कोणाकडे प्रकटीकरण असते. कोणी दुसऱ्या भाषेत बोलतो, कोणी त्या भाषेचा अर्थ सांगतो, प्रत्येक गोष्ट मंडळीच्या वाढीसाठी केली गेली पाहिजे. 27 जर कोणी दुसऱ्या भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एका वेळी एकानेच बोलावे, आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. 28 जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, व स्वतःशी व देवाशी बोलावे.

29 दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी. 30 बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे. 31 जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एका वेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. 32 जे आत्मे भविष्यवाद्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. 33 कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांति आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात,

34 स्त्रियांनी सभेत गप्प बसावे, कारण त्यांच्यासाठी सभेत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते, 35 त्यांना जर काही शिकायचे असेल, तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे. कारण स्त्रीने सभेत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे.

36 तुमच्याकडूनच देवाचा संदेश बाहेर गेला होता काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे? 37 एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. 38 म्हणून जर कोणी ती मानत नसेल, तर त्यालाही मानण्यात येणार नाही.

39 म्हणून माझ्या बंधूनो, देवासाठी संदेश देण्यासाठी उत्सुक असा, दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्याला मना करु नका. 40 तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes