Add parallel Print Page Options

इस्राएलच्या जनगणनेचे पातक

21 सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले. दावीद यवाबला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, “इस्राएलमधील सर्व लोकांच्या मोजणीला लागा. बैरशेब्यापासून दानपर्यंत सर्व प्रदेश पालथा घाला. कोणीही वगळले जाता कामा नये. मग मला एकंदर संख्या किती आहे ते येऊन सांगा.”

यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”

पण राजा दावीद काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तेव्हा यवाबला राजाज्ञेप्रमाणे वागणे भाग पडले. यवाब निघाला आणि लोकांची मोजणी करत त्याने सर्व प्रदेश तुडवायला सुरुवात केली. मग यरुशलेमला परत येऊन दावीदाला त्याने एकंदर लोकसंख्या सांगितली. इस्राएलमध्ये 11,00,000 तलवार धारी पुरुष होते आणि यहूदात 4,70,000. यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती कारण राजा दावीदाचा हुकूम त्याला मान्य नव्हता. देवाच्या दृष्टीने दावीदाची ही चूक होती म्हणून देवाने इस्राएलला शासन केले.

इस्राएलला शासन

मग दावीद देवाला म्हणाला, “माझ्या हातून हा मूर्खपणा झाला आहे. इस्राएलमधील लोकांची मोजणी करुन मी पाप केले आहे. या अपराधाबद्दल या तुझ्या सेवकाला तू या पापाची क्षमा करावीस अशी मी विनवणी करतो.”

9-10 गाद हा दावीदाचा संदेष्टा होता. त्याला परमेश्वर म्हणाला, “जा, जाऊन दावीदाला सांग: ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे: तीन गोष्टीमधून निवड करायची संधी मी तुला देतो. तू त्यांतील एक निवड. तू निवडशील ती शिक्षा मी तुला करीन.’”

11-12 मग गाद दावीदाकडे गेला. दावीदाला तो म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘दावीद तुझ्या शिक्षेची निवड तूच कर: अन्नधान्याच्या टंचाईची तीन वर्षे, किंवा शत्रू तलवारीने तुझा पाठलाग करत आहे आणि तुला पळता भुई थोडी झाली आहे असे तीन महिने किंवा परमेश्वराच्या शिक्षेचे तीन दिवस. या काळात देशभर भयंकर रोगराई पसरेल आणि परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांचा संहार करील.’ दावीद मला देवाने पाठवले आहे. आता मी त्याला काय उत्तर देऊ ते तू ठरव आणि मला सांग.”

13 दावीद गादला म्हणाला, “मी भलत्याच संकटात सापडलो आहे. माझ्या शिक्षेच्या बाबतीत माणूस काय ठरवणार? परमेश्वर दयाघन आहे. मला शासन कसे करायचे ते त्यालाच ठरवू दे.”

14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले. 15 यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेश्वराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

16 दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखवट्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते. 17 दावीद देवाला म्हणाला, “पाप माझ्या हातून घडले आहे लोकांच्या मोजणीचा हूकूम मी दिला. माझे चुकले. इस्राएल लोक निरपराध आहेत. परमेश्वरा, देवा शासन करायचे ते मला आणि माझ्या कुटुंबियांना कर. पण तुझ्या लोकांचा जीव घेणारी ही रोगाची साथ थांबव.”

18 मग परमेश्वराचा दूत गादला म्हणाला, “परमेश्वराच्या उपासनेसाठी दावीदाला एक वेदी बांधायला सांग. अर्णान यबूसीच्या खळ्या जवळ त्याने ती बांधावी.” 19 गादने हे दावीदाला सांगितले. दावीद अर्णानच्या खळ्याकडे गेला.

20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळून पाहतो तर त्याला देवदूत दिसला. अर्णानचे चारही मुलगे त्याला पाहून लपून बसले. 21 दावीद अर्णान कडे गेला. अर्णान खळ्यातून राजाजवळ गेला आणि त्याने राजाला डोके जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.

22 राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”

23 अर्णान दावीद राजाला म्हणाला, “हे खळे मी तुम्हाला दिले. तुम्ही आमचे स्वामी आणि पोशिंदे आहात. तुम्ही त्याचे हवे ते करा. यज्ञात अर्पण करण्यासाठी मी बैलही देईन. तसेच वेदीवरील होमात घालण्यासाठी लाकडी फळ्या, आणि धान्यार्पणासाठी गहू हे ही सर्व मी तुम्हाला देईन.”

24 तेव्हा राजा दावीद अर्णानला म्हणाला, “मी तुला त्याची पूर्ण किंमत देईन. तुझ्याकडून काढून घेऊन मी ते परस्पर परमेश्वराला वाहणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”

25 आणि दावीदाने खळ्याचे मूल्य म्हणून अर्णानला 25 पौंड सोने दिले. 26 दावीदाने त्या जागी परमेश्वराच्या उपासनेकरिता वेदी बांधली. तेथे त्याने होम आणि शांती-अर्पणे केली. दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला. तो दिव्य अग्नी नेमका होमार्पणाच्या वेदीवर पडला. 27 मग परमेश्वराने देवदूताला आपली तलवार म्यान करायला सांगितले.

28 अर्णानच्या खळ्यावर परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलेले पाहून दावीदाने परमेश्वरासाठी यज्ञ केले. 29 (पवित्र निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनमध्ये उच्च स्थानावर होती. इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो पवित्र निवासमंडप बांधला होता. 30 परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या धाकाने दावीद देवापुढे पवित्र निवासमंडपाकडे जाण्यास घाबरत होता.)