A A A A A
Bible Book List

1 इतिहास 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दावीदाचा साम्राज्यविस्तार

18 पुढे दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी करुन त्यांचा पराभव केला. पलिष्ट्यांकडून त्याने गथ आणि त्याच्या आसपासची गावे काबीज केली.

मग त्याने मवाबवर हल्ला केला. मवाबी लोक दावीदाचे अंकित झाले आणि त्याला खंडणी देऊ लागले.

हदरेजरच्या सैन्याशीही दावीद लढला. हदरेजर हा सोबचा राजा. दावीदाने त्या सैन्याशी हमाथ नगरापर्यंत दोन हात केले. हदरेजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत वाढवू पाहात होता म्हणून दावीदाने हे केले. हदरेजरकडून त्याने 1,000 रथ, 7,000 सारथी, आणि 20,000 सैन्य एवढे घेतले. हदरेजरच्या रथांचे जवळपास सर्व घोडेही दावीदाने जायबंदी केले. 100 रथांपुरते घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.

दिमिष्क नगरातील अरामी लोक हदरेजर याच्या मदतीला आले, पण त्यांच्यापैकी 22,000 जणांनाही दावीदाने जिवे मारले. अराममधील दिमिष्कात दावीदाने ठाणी बसवली. अरामीलोक दावीदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जाईल तेथे परमेवराने त्याला विजयी केले.

हदरेजरच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि यरुशलेमला आणल्या. टिमथ आणि कून या नगरांमधील पितळही हस्तगत केले. ही नगरे देखील हदरेजरच्याच आधिपत्याखाली होती. पुढे हे पितळ वापरुन शलमोनाने मंदिरासाठी गंगाळ स्तंभ आणि इतर वस्तू करवल्या.

तोवू हा हमाथ नगराचा राजा होता आणि हदरेजर सोबाचा. दावीदाने हदरेजरच्या सैन्याचा पाडाव केल्याची बातमी तोवूच्या कानावर आली. 10 तेव्हा त्याने हदोराम या आपल्या मुलाला दावीदाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले. दावीदाने हदरेजरचा पराभव केल्यामुळे तोवूने पाऊल उचलले. तोवू आणि हदरेजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने दावीदाला सोने, रुपे, पितळ यांपासून बनवलेल्या वस्तूंचा नजराणा दिला. 11 राजा दावीदाने त्या वस्तू शुध्दीकरण करुन परमेश्वराला अर्पण केल्या. अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी लोकांकडून आलेल्या वस्तूही त्याने अशाच परमेश्वराला वाहिल्या.

12 सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले. 13 अदोममध्ये अबीशयने मजबूत ठाणी बसवली आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला सर्वत्र जय मिळवून दिला.

दावीदाचे प्रमुख कारभारी

14 दावीदाने सर्व इस्राएलवर राज्य केले. त्याने प्रत्येक नागरीकाला उचित अशी न्यायाची वागणूक दिली. 15 सरुवेचा मुलगा यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट दावीदाचा वृत्तांत लेखक होता. 16 सादोक आणि अबीमलेख याजक होते. सादोक हा अहीटूबचा मुलगा आणि अबीमलेख हा अब्याथारचा. शवूशा हा लेखनिक होता. 17 यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes