A A A A A
Bible Book List

स्तोत्रसंहिता 9 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

प्रमुक गायकासाठी मूथ लाब्येन या सुरावर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.

मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो.
    परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन.
तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा,
    मी तुझ्या नामाचा महिमा गातो.
माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले.
    परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.

तू सगळ्यात न्यायी आहेस तू तुझ्या सिंहासनावर न्यायाधीश म्हणून बसलास.
    परमेश्वरा, तू माझे गाऱ्हाणे ऐकलेस आणि तू माझा न्यायनिवाडा केलास.
तू दुसऱ्या लोकांवर टीका केलीस.
    परमेश्वरा, तू त्यांचा नाश केलास.
    तू त्यांची नावे जिवंत माणसांच्या यादीतून कायमची पुसून टाकलीस.
शत्रूचा निपात झाला परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास.
    आता केवळ पडकी घरे उभी आहेत
    त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही.

परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो.
    त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले.
परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतो
    आणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो.
खूप लोक सापळ्यात अडकले
    आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती.
संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत.
    परमेश्वरा, त्यांना आश्रय देणारी एक चांगली जागा तू बन.

10 ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे
    ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले,
    तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.

11 सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
    परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12 जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेले [a]
    त्यांची आठवण त्याने ठेवली
त्या गरीब लोकांनी मदतीची याचना केली
    आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही.

13 मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर,
    बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत.
    माझे ‘मृत्यूच्या दारा’ पासून रक्षण कर.
14 नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन.
    तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”

15 ती इतर राष्ट्रे दुसऱ्या लोकांना सापळ्यात पकडण्यासाठी खड्डे खणतात.
    परंतु ते स्वतच त्या खड्यांत पडले.
दुसऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी जाळे लावले.
    परंतु ते स्वतच त्या जाळ्यात अडकले.
16 परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले.
    परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन. [b]

17 जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात.
    ते लोक मृत्युलोकात जातील.
18 कधी कधी देव संकटात असलेल्यांना विसरतो असे वाटते.
    त्या गरीबांना काही आशा नाही असेही वाटते.
    परंतु देवत्यांना कायमचा कधीच विसरत नाही.

19 परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर.
    आपण सामर्थ्यवान आहोत असा विचार लोकांना करु देऊ नकोस.
20 लोकांना धडा शिकव.
    आपण केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे.

Footnotes:

  1. स्तोत्रसंहिता 9:12 मदतीसाठी गेले शब्दश: “रक्त मागितले जर एखादा माणूस मारला गेला तर त्याचे कुटुंबीय कोर्टात न्याय मागण्यासाठी जातात.” इथे याचा अर्थ जो इतरांकडून दुखावला गेला आहे त्याच्याकडे देव न्यायाधीश म्हणून लक्ष देतो.
  2. स्तोत्रसंहिता 9:16 हिग्गायोन किवा “ध्यान चिंतन” याचा अर्थ गाण्याच्या वेळी शांत होऊन चिंतन करण्याची वेळ असाही होऊ शकेल.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes