Add parallel Print Page Options

स्मरण दिवसाचे दावीदाचे स्तोत्र.

38 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस
    तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
परमेश्वरा, तू मला इजा केलीस
    तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे.
    मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस.
त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे
    आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
मी मूर्खपणा केला आता
    मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
मी धनुष्यासारखा वाकलो आहे
    आणि मी दिवसभर उदास असतो.
मला ताप आला आहे
    आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
मी फार अशक्त झालो आहे
    मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे
    उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
10 माझे हृदय धडधडत आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे
    आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र
    आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत.
    माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
    ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत.
    ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे.
    मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे.
    मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर.
    देवा, तूच माझ्यावतीने बोल.
16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील.
    मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुका केल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे.
    हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले.
    मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत
    आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात
    आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या.
मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला
    परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
21 परमेश्वरा, मला सोडू नकोस.
    देवा माझ्याजवळ राहा.
22 लवकर ये आणि मला मदत कर.
    माझ्या देवा मला वाचव!