A A A A A
Bible Book List

स्तोत्रसंहिता 102 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.

102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
    माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
    माझ्याकडे लक्ष दे.
    मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
    हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे.
    मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
    मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
    जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
मी झोपू शकत नाही.
    मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
    ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
    माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
    तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.

11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
    मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
    तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
    तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
    त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
    देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
    पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
    देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव
    आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील.
    परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल.
    ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील.
    ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये
    परमेश्वराची एकत्र सेवा करतील.

23 मला माझ्या शक्तीने दगा दिला.
    माझे आयुष्य कमी झाले.
24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस.
    देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस.
    तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील.
    ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि
    कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस.
    तू सर्वकाळ राहाशील.
28 आज आम्ही तुझे सेवक आहोत.
    आमची मुले इथे राहातील
    आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes