A A A A A
Bible Book List

शास्ते 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दान लोकांचा लईश नगरावर ताबा

18 त्याकाळी इस्राएलवर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहात होते. त्यांना अजून स्वतःची अशी भूमी नव्हती. इतर इस्राएलांप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

तेव्हा दानवंशजांनी जागा हेरण्यासाठी पाच शूर माणसे निवडली ती सरा आणि अष्टावोल या प्रांतातली होती. सर्व कुळांचे प्रतिनिधित्व ती करत होती. जागा पाहण्याचा आदेश मिळाल्यावर चांगल्या जागेच्या शोधार्थ हे पाचजण निघाले.

एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आल्यावर मीखाच्या घराजवळ त्यांनी रात्रीपुरता मुक्काम केला. मीखाच्या घरापाशी ते आले तेव्हा त्यांना एका तरुण लेवी माणसाचा आवाज ऐकू आला. आवाज ओळखून ते घरापाशी थांबले. त्यानी लेवीला विचारले, “तू इथे कसा आलास? कोणी आणले तुला इथे? इथे तू काय करतोस?”

मीखाने जे जे केले ते त्याने या लोकांना सांगितले तो म्हणाला, “मला त्याने वेतन देऊन नेमले आहे. मी त्याचा पुरोहित आहे.”

तेव्हा ते त्याला म्हणाले, “परमेश्वराजवळ तू आमच्यासाठी काहीतरी माग वस्ती करण्यास योग्य अशी जागा शोधण्यात आम्हाला यश येईल का, हे जाणण्याची आम्हांला इच्छा आहे.”

तो पुरोहित त्या पाच जणांना म्हणाला, “तुम्ही शांततेने जा. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल.”

तेव्हा ते पाचजण तेथून निघाले. लईश या नगराशी ते आले. येथील लोकांचे जीवन सिदोनी लोकांसारखे आहे. ते निश्चिंत आहेत. सुखा समाधानात आहेत हे त्यांनी पाहिले. सर्व गोष्टींची तिथे सुबत्ता होती. शत्रूचा उपद्रव नव्हता. सादोन पासून हा भाग लांब होता. तसेच अरामी लोकांशीही त्यांचा काही संबंध नव्हता.

हे पाहून हे पाचजण सरा आणि अष्टावोल या आपल्या शहरांमध्ये परतले. तेथील भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्हांला काय आढळले?”

ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरुन ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ न दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करु. जाऊन तिथला ताबा मिळवू. 10 तेथे जागा भरपूर आहे, अन्नधान्य मुबलक आहे. तेथे गेल्यावर तुमच्या ते लक्षात येईलच. शिवाय, हल्ल्याची लोकांना कल्पनाही नसल्याने ते निर्धास्त आहेत. खरोखर परमेश्वराने ही जमीन आपल्याला दिली आहे.”

11 तेव्हा सरा आणि अष्टावोल येथून हल्लयाच्या तयारीने दान वंशातील सहाशे जण निघाले. 12 लईशच्या वाटेवर असताना त्यांनी यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ ठोकला. म्हणूनच किर्याथ-यारीमच्या पश्चिमेकडील या भागाला अजूनही महाने दान म्हणजेच दान लोकांची छावणी म्हणून ओळखले जाते. 13 येथून पुढे ते प्रवास करत एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापाशी येऊन पोचले.

14 यापूर्वी येऊन लईश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले. “इथल्या एका घरात एफ्रोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायचे माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायचे” 15 आणि ते पाचजण मीखाच्या घराशी थांबले. तेथे तो तरुण लेवी होताच त्यांनी “तू कसा आहेस?” म्हणून विचारले 16 बाकीची दान वंशातील सहाशे हत्यारबंद माणसे वेशीजवळ उभी होती. 17-18 हे पाच जण घरात घुसले. त्यांनी सर्व कोरीव मूर्ती, घरातील बाकीच्या मूर्ती आणि चांदीची मूर्ती, एफोद हे सर्व लुटले तेव्हा तो लेवी पुरोहित बाहेर त्या सहाशे जणांच्या जमावाबरोबर होता. तो म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?”

19 ते पाच जण म्हणाले, “गप्प राहा, एक शब्दही काढू नकोस. आमच्या बरोबर चल. आमच्यातील वडीलधारा आणि याजक हो. आता तूच निवड कर, फक्त एका माणसाचा पुरोहित होऊन राहाणे बरे की, इस्राएलांच्या एका आख्ख्या वंशाचे याजक होणे बरे?”

20 याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला.

21 मग ही सहाशे दान माणसे, या लेवी तरुणाबरोबर निघाली. मीखाचे घर मागे टाकून ते आपल्या वाटेने गेले. लहान मुले. गुरेढोरे. सामानसुमान असा सर्व लवाजमा त्यांनी आपल्या पुढे ठेवला होता.

22 तेबरेच पुढे गेल्यावर इकडे मीखाच्या जवळ राहणारे सर्व लोक एकत्र आले. त्यांनी दान लोकांचा पाठलाग केला व त्यांना गाठले. 23 मीखाचे लोक दान लोकांच्या नावाने गर्जना करत होते. ते ऐकून दान लोक मागे वळून मीखाला म्हणाले, “काय गडबड आहे? तुम्ही का ओरडताय?”

24 मीखा म्हणाला, “तुम्ही माझ्या मूर्ती पळवल्यात. मी त्या स्वतः घडवल्या आहेत. माझ्या पुरोहितालाही तुम्ही घेऊन चालला आहात. माझे आता काय राहिले? ‘काय गडबड आहे?’ असे वर आणखी मलाच विचारता?”

25 दान लोकांनी सांगितले, “तू वाद न घातलेला बरा. आमच्या पैकी काही फार रागीष्ट आहेत. तू ओरडलास तर ते तुझ्यावर हल्ला करतील. तू आणि तुझे कुटुंबीय उगीचच जिवाला मुकाल.”

26 एवढे बोलून दान लोक परत फिरले आणि आपल्या मार्गाला लागले. हे लोक आपल्याला भरी आहेत हे लक्षात घेऊन मीखाही घरी परतला.

27 अशाप्रकारे मीखाच्या मूर्ती, पुरोहित हे सर्व मिळवून ते लईश येथे पोहोंचले. त्यांनी लईश येथील रहिवाश्यांवर हल्ला चढवला. सर्वत्र शांतता नांदत असताना हल्ला होईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. लोकांना तरवारीने कापून काढून दान लोकांनी शहराला आग लावली. 28 लईश येथील लोकांच्या मदतीला धावून येणारे कोणी नव्हते. सिदोन शहरापासून ते फार लांब होते तेव्हा तेथील लोकांना मदतीसाठी तेथे येणे शक्य नव्हते आणि अरामी लोकांशी त्यांचा कुठला करार झालेला नसल्याने तेही आले नाहीत. बेथ-रहोबच्या ताब्यात असलेल्या खोऱ्यात लईश हे शहर होते. दान लोकांनी तेथे नवे शहर वसवले आणि तेथे ते राहू लागले. 29 पूर्वीचे लईश हे नाव बदलून त्यांनी त्याला दान हे नाव दिले. इस्राएलाचा एक वंशज दान हा त्यांचा पूर्वज होता, त्याच्यावरुन हे नाव मिळाले.

30 दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षोमचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती. 31 मंदिर शिलोह येथे असेपर्यंत दानचे लोक मीखाने केलेल्या मूर्तीची पूजाअर्चा करत होते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes