A A A A A
Bible Book List

शास्ते 11 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

11 इफ्ताह हा खंबीर लढवय्या असून तो गिलाद वंशातील होता. पण तो एका वेश्येचा मुलगा होता. याच्या वडीलांचे नाव गिलाद. गिलादच्या बायकोला खूप मुले झाली. ही मुले मोठी झाल्यावर त्यांना इफ्ताह आवडेनासा झाला त्यांनी त्याला आपले गाव सोडायला लावले. ते म्हणाले, “तुला आमच्या वडीलांच्या मिळकतीतील हिस्सा मिळणार नाही. तू दुसऱ्या बाई पासून झालेला आहेस.” भावांच्या या वर्तणुकीमुळे त्याला दूर जावे लागले. तो टोब देशात जाऊन राहिला. तेव्हा तेथील काही रांगडी माणसेही त्याला येऊन मिळाली.

काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली. यावेळी गिलादमधील वडीलधारे नेते इफ्ताह कडे आले. टोब सोडून त्याने गिलाद मध्ये परत यावे असे त्यांना वाटत होते.

म्हणून ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा सामना करायला तू आमचे नेतृत्व कर.”

पण इफ्ताह त्यांना म्हणाला, “तुम्हीच तर मला माझ्या वडीलांचे घर सोडायला लावलेत. तुम्ही माझा तिरस्कार करता. आता अडचणीत आल्यावर माझ्याकडे का येता?”

त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करुन अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.”

तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “या लढ्यासाठी माझी तुम्हाला गरज आहे हे ठीक आहे. पण परमेश्वराच्या मदतीने मी जिंकलो तर मी तुमचा नेता होईन.”

10 तेव्हा गिलादचे अधिकारी पुरुष इफ्ताहाला म्हणाले, “आमचे सर्व बोलणे परमेश्वर ऐकत आहे. तू आम्हाला जे जे करायला सांगशील ते ते आम्ही करु आम्ही हा शब्द दिला आहे.”

11 तेव्हा इफ्ताह त्यांच्या बरोबर गेला. त्यांचा तो नेता आणि सेनापती बनला. मिस्पा नगरात परमेश्वरासमोर इफ्ताहने आपल्या सर्व शब्दांची उजळणी केली.

अम्मोनी राजाला इफ्ताहचा संदेश

12 इफ्ताहने अम्मोनी लोकांच्या राजाकडे दूतानकरवी संदेश पाठवला तो असा: “अम्मोनी लोक आणि इस्राएल लोक यांच्यामध्ये कोणताही तंटा बखेडा नसताना तू आमच्यावर चढाई का करतोस?”

13 त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले. “इस्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. आर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लढत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.”

14 हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला. [a] तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला. 15 संदेश असा होता:

“इफ्ताहचे म्हणणे असे. मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी लोकांनी बळकावलेली नाही. 16 मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएल लोक प्रथम वाळवंटात गेले तेथून ते लाल समुद्राकडे गेले त्यानंतर ते कादेश येथे आले. 17 त्यानी अदोमच्या राजाकडे संदेश पाठवला. संदेश घेऊन जाणाऱ्या दूतांनी त्या देशामधून जाऊ देण्याची राजाला विनंती केली. पण अदोमच्या राजाने ती मानली नाही. तेव्हा असाच संदेश आम्ही मवाबच्या राजालाही पाठवला. त्यानेही ते झिडकारले. तेव्हा इस्राएल लोक कादेश येथे राहिले.

18 “अदोम आणि मवाब या देशांना वळसा घालून इस्राएल लोक वाळवंटामधून गेले. मवाबच्या पूर्वेकडे त्यांनी अर्णोन नदीच्या पलीकडच्या तीरावर तळ ठोकला. त्यांनी मवाबची सीमा ओलांडली नाही. (अर्णोन नदी हीच मवाबची सीमा.)

19 “नंतर इस्राएल लोकांनी अमोऱ्यांवा राजा सीहोन याच्याकडे दूत पाठवले. सीहोन हा हेशबोनचा राजा. दूत सीहोनला म्हणाले, ‘आम्हा इस्राएल लोकांना तुझ्या भूमीतून जाऊ दे आम्हाला आमच्या प्रदेशात पोहोंचायचे आहे.’ 20 पण अमोऱ्यांचा राजा सीहोन इस्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देईना. उलट त्याने आपले सैन्य गोळा केले आणि याहस येथे तळ दिला. इस्राएल लोकांशी अमोऱ्यांनी युध्द केले. 21 यावेळी इस्राएलच्या परमेश्वर देवाने सीहोन आणि त्याचे सैन्य यांचा पराभव करायला इस्राएल लोकांना मदत केली. त्यांमुळे अमोऱ्यांची भूमी ही इस्राएल लोकांची मालमत्ता बनली. 22 अर्णोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देन नदीपर्यंत अमोऱ्यांचा सर्व प्रदेश इस्राएल लोकांच्या ताब्यात आला.

23 “इस्राएलच्या परमेश्वर देवाने अमोऱ्यांना आपला प्रदेश सोडून द्यायला भाग पाडले आणि तो प्रदेश इस्राएल लोकांना दिला. आता इस्राएल लोकांना तो प्रदेश सोडायला लावणे तुला जमेल असे तुला वाटते? 24 कमोश या तुमच्या देवाने दिलेल्या भूमीत तुम्ही खुशाल राहू शकता. म्हणजे आमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत आम्ही राहू. 25 मवाबचा राजा सिप्पोर पुत्र बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इस्राएल लोकांशी युध्द करायला सरसावला का? 26 हेशबोन शहरआणि त्याच्या आसपासची गावे यात इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे राहात आहेत. अरोएर आणि त्याच्या भोवतालची गावे, अर्णोन नदीच्या काठावरची गावे या सर्व ठिकाणी इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे आहेत. त्या काळात तुम्ही कधी ती परत मिळवायचा प्रयत्न का केला नाहीत? 27 इस्राएल लोकांनी तुमचे कधी वाकडे केले नाही पण तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहात. आता, इस्राएल लोकांची बाजू न्यायाची आहे की अम्मोनी लोकांची याचा निर्णय खुद्द तो न्यायाधीश परमेश्वरच करो!”

28 पण इफ्ताहच्या या संदेशाकडे अम्मोनी लोकांच्या राजाने सरळसरळ दुर्लक्ष केले.

इफ्ताहचे नवस

29 मग परमेश्वराचा आत्मा इफ्ताहमध्ये संचारला. इफ्ताह गिलाद आणि मनश्शे यांच्या प्रदेशातून गिलादमधील मिस्पा नगरात आला. तेथून तो अम्मोनी लोकांच्या प्रदेशात घुसला.

30 इफ्ताह परमेश्वराला नवस बोलला तो म्हणाला, “तू जर मला अम्मोन्यांचा पराभव करु दिलास तर, 31 विजयी झाल्यावर मी परत येईन तेव्हा माझ्या घरातून जो कोणी मला सामोरा येईल त्याला मी तुला होमबली म्हणून अर्पण करीन”

32 मग इफ्ताहने अम्मोन्यांवर हल्ला चढवला. त्यांचा पराभव करण्यात त्याला परमेश्वराचे साहाय्य झाले. 33 अरोएर नगरापासून मिन्नीथ नगरापर्यंत वीस नगरे त्याने काबीज केली. आबेल करामीम येथपर्यंत त्याने अम्मोन्यांचा बीमोड केला. इस्राएल लोकांनी अम्मोन्यांचा पराभव केला. अम्मोन्यांचा हा पराभव प्रचंड होता.

34 इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूलबाळ नव्हते. 35 तिलाच प्रथम आलेली पाहताच दु:खावेगाने तो अंगावरची वस्त्रे फाडू लागला. तो म्हणाला, “मुली, सत्यानाश झाला. मला तू दु:खाच्या खाईत लोटले आहेस. मी तर परमेश्वराला नवस बोललो आहे आणि मला आता माझा शब्द फिरवता येणार नाही.”

36 तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबा, तुम्ही नवस बोलला आहात तर तो फेडायलाच हवा. कबूल केलेत त्याप्रमाणे आता वागा. परमेश्वराने ही अम्मोन्यांचा पराभव करायला तुम्हाला साहाय्य केलेच की नाही?”

37 पुढे ती आपल्या वडीलांना म्हणाली, “पण माझ्यासाठी एक करा. दोन महिने मला एकटीला राहू द्या. डोंगरांमध्ये मी राहीन. आता माझे लग्न होणार नाही की मला मुलेबाळे होणार नाहीत. तेव्हा मला आणि माझ्या सख्यांना गव्व्यात गळे घालून शोक करू द्या.”

38 इफ्ताह म्हणाला, “खुशाल तसे कर” त्याने दोन महिन्यांसाठी तिची रवानगी केली. ती आणि तिच्या मैत्रिणी डोंगरांमध्ये राहिल्या. कुमारिका म्हणूनच तिला मरण येणार म्हणून त्यांनी शोक केला.

39 दोन माहिने असे गेल्यावर ती आपल्या बापाकडे परत आली. इफ्ताहने परमेश्वराला नवस बोलल्याप्रमाणे सर्व काही केले. इफ्ताहची मुलगी कुमारिकाच राहिली. तेव्हा इस्राएलामध्ये एक प्रथा पडून गेली. 40 गिलादमधील इफ्ताहच्या मुलीचे सर्व इस्राएल स्त्रिया स्मरण ठेवतात दरवर्षी चार दिवस त्या तिच्या प्रीत्यर्थ शोक करतात.

Footnotes:

  1. शास्ते 11:14 हा निरोप … सांगितला हिब्रू सांहितेत हे वाक्य नाही. प्राचीन ग्रीक भाषांतरातून हे घेतले आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes