A A A A A
Bible Book List

यहोशवा 9 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

गिबोनाच्या रहिवाश्यांचे यहोशवाशी कपट

यार्देन नदीच्या पश्चिमेकडील हित्ती, अमोरी, कनानी, हिव्वी तसेच यबूसी लोकांच्या राजांनी या आयवरील चढाई विषयी ऐकले. या लोकांची राज्ये डोंगराळ भागात तसेच मैदानी प्रदेशात थेट लबानोनपर्यंत भूमध्य समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने पसरली होती. हे सर्व राजे एक झाले आणि त्यांनी यहोशवा व इस्राएल लोक यांच्यावर चढाई करण्याचा बेत केला.

यरीहो आणि आय या नगरांचा पाडाव यहोशवाने कसा केला हे गिबोनाच्या लोकांनी ऐकले. तेव्हा त्यांनी इस्राएलांना चकवण्याचा डाव आखला. त्यांची युक्ती अशी होती. प्रथम त्यांनी द्राक्षरसाचे जुने, झिजलेले. चामडी बुधले [a] घेतले आणि ते गाढवाच्या पाठीवर लादले. आपण फार दुरून आलो आहोत असे भासवायला जुनी गोणपाटेही गाढवांवर लादली. स्वतः झिजलेले जोडे आणि फाटकेतुटके कपडे घातले. विटलेल्या वाळलेल्या भाकरीची शिदोरी बांधून घेतली. अशाप्रकारे ते फार दुरून मजल दरमजल करत आल्यासारखे दिसू लागडे. मग ते गिलगाल जवळच्या इस्राएल लोकांच्या छावणीपाशी आले.

तेथे जाऊन ते यहोशवा आणि इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत आणि आम्हाला तुमच्याशी शांततेच्या कराराची बोलणी करायची आहेत.”

त्यावर इस्राएल लोक या हिव्वी लोकांना म्हणाले, “कदाचित् तुम्ही खोटे बोलत असाल. आमच्या जवळपासच राहणारे असाल. तुम्ही कोण कुठले याची खातरजमा केल्याखेरीच आम्ही तुमच्याशी शांतीचा करार करणार नाही.”

तेव्हा यहोशवाला हिव्वी म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.”

पण यहोशवाने विचारले, “तुम्ही कोण? कोठून आलात?”

त्या लोकांनी सांगिलते, “आम्ही तुमचे दास आहोत. तुमच्या परमेश्वर देवाच्या सामर्थ्याची कीर्ती ऐकून आम्ही फार दूरवरून आलो आहोत. त्याने ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आम्ही ऐकले. मिसरमध्ये त्याने जे जे केले ते आमच्या ऐकण्यांत आले. 10 हेशबोनचा राजा सीहोन आणि अष्टारोथ मधील बाशानचा राजा ओग, या यार्देनच्या पूर्वेकडील अमोऱ्यांच्या दोन राजांचा त्याने पराभव केला हेही आम्हाला माहीत आहे. 11 तेव्हा आमच्या प्रदेशातील रहिवासी आणि आमचे पुढारी म्हणाले, ‘प्रवासासाठी पुरेशी शिदोरी घ्या आणि इस्राएल लोकांची भेट घ्या,’ त्यांना म्हणावे, ‘आम्ही तुमचे दास असून आमच्याबरोबर शांततेचा करार करा.’

12 “ही आमची भाकर बघा. आम्ही घरून निघालो तेव्हा ती ताजी आणि नरम होती. आता कशी विटलेली आणि वाळून गेली आहे ते तुम्ही बघतच आहा. 13 हे द्राक्षारसाचे बुधले पाहा.निघालो तेव्हा ते नवेकोरे आणि द्राक्षारसाने भरलेले होते. आता ते तडकलेले आणि जुने झाले आहेत. पाहा आमचे कपडे आणि जोडे एवढया लांबच्या प्रवासाने त्यांची कशी वाट लागली आहे.”

14 हे लोक सांगत आहेत त्याचा खरेपणा पडताळून बघण्यासाठी इस्राएल लोकांनी भाकर चाखून बघितली पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. 15 यहोशवाने त्यांच्याशी शांततेचा करार करण्याचे मान्य केले. त्यांना जीवदान दिले. यहोशवाने दिलेल्या वचनाशी इस्राएलांची वडीलधारी मंडळीही सहमत झाली.

16 ही माणसे आपल्या छावणीजवळच राहात असल्याचा इस्राएल लोकांना तीन दिवसांनंतर पत्ता लागला. 17 तेव्हा इस्राएल लोक या लोकांच्या नगराला निघाले. गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम या त्यांच्या नगरांस ते तिसऱ्या दिवशी पोचले. 18 पण या लोकांशी शांततेचा करार केलेला असल्यामुळे इस्राएली सैन्याने या नगरावर हल्ला केला नाही. तसे त्यांनी आपल्या परमेश्वर देवासमोर या लोकांना वचन दिले होते.

ज्या वडीलधाऱ्या पंच मंडळीनी हा करार केला त्यांच्याविरूध्द इतर लोकांनी कुरकूर केली. 19 पण पंच म्हणाले, “आम्ही खुद्द इस्राएलाच्या परमेश्वर देवासमोर त्यांना आपला शब्द दिला आहे. तेव्हा आता त्यांच्याविरूध्द लढता येणार नाही. 20 आता आपल्याला त्यांना धक्का लावता येणार नाही त्यांना जीवदान दिले पाहिजे. आता त्यांना इजा केल्यास, त्यांना आपण दिलेला शब्द मोडला म्हणून देवाचा आपल्यावर कोप होईल. 21 त्यांना जिवंत राहू द्या, पण आपले दास म्हणून ते आपले लाकूडतोडे. पाणक्ये म्हणून राहतील.” अशा तऱ्हेने पंचांनी त्या लोकांना दिलेले शांततेचे अभिवचन पाळले.

22 यहोशवाने गिबोनच्या लोकांना बोलावले व तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आमच्याशी खोटे का बोललात? तुमचा प्रदेश तर आमच्या छावणीच्या जवळच आहे. पण आपण दूरदेशाहून आल्याचे तुम्ही आम्हाला सांगितलेत. 23 तेव्हा आता तुम्हाला अडचणींना तोड द्यावे लागेल. तुम्हा सर्वांना आमचे दास व्हावे लागेल. तुम्हाला देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणक्ये म्हणून काम करावे लागेल.”

24 यावर गिबोनचे लोक म्हणाले, “तुम्ही आम्हाला ठार कराल या भीतीने आम्ही खोटे बोललो. आम्ही असे ऐकले की हा देश तुम्हाला द्यायची परमेश्वराने मोशे या आपल्या सेवकाला आज्ञा केली आहे, तसेच येथे राहाणाऱ्या सर्वांना ठार करायला ही देवाने तुम्हाला सांगितले आहे. म्हणून आम्ही खोटे बोललो. 25 आता आम्ही तुमचे दास आहोत. आमच्याबाबतीत तुम्हाला योग्य वाटेल ते करा.”

26 अशाप्रकारे गिबोनचे लोक दास झाले पण यहोशवाने त्यांना जीवदान दिले. इस्राएल लोकांपासून त्यांना वाचवले. 27 यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.

Footnotes:

  1. यहोशवा 9:4 द्राक्षरसाचे … बुधले द्राक्षारस ठेवण्यासाठी जनावराच्या कातडचापासून बनविलेला बुधला.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes