A A A A A
Bible Book List

यहोशवा 18 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

उर्वरीत प्रदेशाची वाटणी

18 सर्व इस्राएल लोक शिलोह येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते. देवाने वचन दिल्या प्रमाणे इस्राएल वंशजातील सात कुळांना जमिनीचा हिस्सा अजून मिळाला नव्हता.

तेव्हा यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुम्ही आपली जमीन ताब्यात घ्यायला कोठवर थांबणार? तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने ती तुमच्या हवाली केली आहे. आता प्रत्येक वंशातून तीन तीन जणांची निवड करा. त्यांना मी जमिनीची पाहणी करायला पाठवतो. त्यावरुन ते त्या जमिनीचे वर्णन काढतील व माझ्याकडे परत येतील. त्यांनी जमीनीचे सात वाटे करावेत. दक्षिणे कडील भाग यहूदाच्या लोकांकडे आहे. तो तसाच राहील. आणि उत्तरेकडील जमीन योसेफाच्या लोकांकडे आहे ती तशीच राहील. पण तुम्ही फक्त जमिनीचे वर्णन लिहून आणा आणि सात भाग पाडून माझ्याकडे या. कोणी कुठला वाटा घ्यायचा ते आपल्या परमेश्वर देवाच्या म्हणण्यानुसार ठरेल. लेवींना जमिनीत वाटा नाही. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे हाच त्यांचा वाटा. गादी, रऊबेनी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा वाटा मिळालेला आहेच. यार्देनच्या पूर्वेकडील भाग परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यापूर्वीच दिलेला आहे.”

तेव्हा या कामासाठी निवडलेली मंडळी जमिनीच्या पाहणीसाठी बाहेर पडली. त्या प्रदेशाचे वर्णन लिहून काढले व तो यहोशवाकडे परत आणण्यासाठी ती निघाली. यहोशवा त्या लोकांना म्हणाला, “जमिनीचे नीट निरीक्षण करुन त्यांचे वर्णन तयार करा. मग ते घेऊन शिलोह येथे मला येऊन भेटा. तेथे मी चिठ्ठ्या टाकीन. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनुसार जमिनीचे वाटप होईल.”

तेव्हा हे लोक तिकडे गेले. त्यांनी नीट पाहणी करून यहोशवासाठी तिचे वर्णन लिहून काढले. प्रत्येक नगराचा अभ्यास करुन त्यांनी त्या प्रदेशाच्या सात वाटण्या केल्या. वर्णन घेऊन मग ते शिलोह येथे यहोशवाला भेटायला आले. 10 यहोशवाने शिलोह येथे परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकल्या. अशा प्रकारे जमिनीची विभागणी होऊन प्रत्येक वंशाला जमिनीत आपापला वाटा मिळाला.

बन्यामीनचा वाटा

11 यहूदा आणि योसेफ यांच्या मधला जमिनीचा हिस्सा बन्यामीनच्या वंशाला मिळाला. त्याच्या वंशातील प्रत्येक कुळाचा त्यात हिस्सा होता. त्यांना मिळालेली जमीन अशी. 12 तिची उत्तरेकडील हद्द यार्देन नदीशी सुरु होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने जाते. मग ती पश्चिमेला डोंगराळ प्रदेशात जाऊन बेथ-आवेनच्या पूर्वेला भिडते. 13 तेथून ती दक्षिणेला लूज (म्हणजेच बेथेल) कडे वळते व खाली अटारोथ अद्दार येथवर जाते. अटारोथ-अद्दार हे बेथ-होरोनच्या दक्षिणेकडील टेकडीवर आहे. 14 तेथे ही हद्द दक्षिणेला वळून टेकडीच्या पश्चिम बाजूने जाते. किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) येथे तिचा शेवट होतो. हे यहूदाच्या वंशजांचे नगर ही झाली पश्चिम बाजू.

15 दक्षिणेकडील हद्द किर्याथ-यारीम येथ सुरु होऊन नफ्तोह नदीपर्यंत जाते. 16 रेफाई खोऱ्याच्या उत्तरेकडील बेन हिन्नोमच्या खोऱ्यानजीकच्या डोंगर पायथ्याकडे ती उतरत जाते. तेथून यबूसी नगराच्या दक्षिणेला हिन्नोम खोऱ्यात उतरुन एन-रोगेल कडे जाते. 17 तेथे उत्तरेला वळून एन-शेमेश कडे जाते. तशीच ती गलीलोथ पर्यंत जाते. (गलीलोथ हे पर्वतांमधल्या अदुम्मीम खिंडीजवळ आहे) रऊबेनाचा पुत्र बोहन याचे नाव दिलेल्या मोठ्या थोरल्या खडकाकडे ही सीमा उतरते. 18 बेथ-अराबाच्या उत्तरेकडील प्रदेशात जाऊन मग ती अराबात खाली उतरते. 19 बेथ-हाग्लाच्या उत्तरेला जाऊन क्षार समुद्राच्या उत्तर किनाऱ्याशी तिचा शेवट होतो. येथे यार्देन नदी समुद्राला मिळते. ही झाली दक्षिण हद्द.

20 यार्देन नदी ही पूर्वेकडील हद्द. बन्यामिनाचा वंशजांना मिळाला तो भाग हा. आता सांगितली ती तिची सीमारेषा. 21 प्रत्येक कुटुंबाला जमीन मिळाली. त्यांची नगरे म्हणजे यरीहो, बेथ होग्ला, एमेक-केसास, 22 बेथ अराबा, समाराईम व बेथेल, 23 अव्वीम, पारा, आफ्रा, 24 कफर-अम्मोनी, अफनी, गेबा ही बारा नगरे व आसपासची गावे.

25 गिबोन, रामा, बैरोथ. 26 मिस्पा, कफीरा, मोजा 27 रेकेम, इपैल, तरला, 28 सेला, ऐलेफ, यबूसी (म्हणजेच यरूशलेम) गिबाथ आणि किर्याथ ही चौदा नगरे आणि आसपासची गावे सुध्दा बन्यामीनाच्या वंशजांना मिळाली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes