A A A A A
Bible Book List

यहेज्केल 33 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएलचा पहारेकरी म्हणून देव यहेज्केलला निवडतो

33 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला. “मानवपुत्रा, तुझ्या माणसांशी बोल त्यांना सांग, ‘ह्या देशावर हल्ला करण्यासाठी कदाचित्, मी शत्रूसैनिकांना आणीन. त्या वेळेस लोक एकाला पहारेकरी म्हणून निवडतील. पहारेकऱ्याने शत्रूसैनिकांस येताना पाहिल्यास, तो तुतारी फुंकून लोकांना सावध करतो. जर लोकांनी तुतारीचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले, तर शत्रू त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. अशा वेळी मृत्यूला ज्याचा तोच जबाबदार असेल. जर एखाद्याने तुतारीचा आवाज ऐकूनही दुर्लक्ष केले. तर त्याच्या मृत्यूची जबबादारी त्याची त्याच्यावरच असेल. तो जर तुतारीच्या आवाजाने सावध झाला असता, तर वाचू शकला असता.

“‘पण, कदाचित्, असेही होईल की शत्रूसैनिकांना पाहूनही पहारेकरी तुतारी फुंकणार नाही. त्याने लोकांना सावध न केल्याने, शत्रूसैनिक त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. त्यांनी पाप केले होते म्हणून ते पकडले जातील हे खरे, पण जर ते ठार मारले गेले, तर त्यांच्या मृत्यूला पहारेकरीही जबाबदार असेल.’

“आता, मानवपुत्रा, इस्राएल लोकांचा पहारेकरी म्हणून मी तुझी निवड करीत आहे. माझ्याकडून संदेश मिळताच, माझ्यावतीने तू लोकांना जागृत केलेच पाहिजेस. मी कदाचित् तुला सांगीन ‘हा दुष्ट मनुष्य मरेल,’ तर तू माझ्यावतीने त्याच्याकडे जाऊन त्याला सावध केलेच पाहिजेस. जर तू त्या दुष्ट माणसाकडे जाऊन त्याला सावध केले नाहीस, त्याचा मार्ग बदलण्याबद्दल त्याला सांगितले नाहीस, तर त्याच्या पापामुळे तो मरेल, पण त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावरही येईल. पण तू त्या पाप्यास सावध करुन कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो माणूस त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.

देवाला लोकांचा नाश करण्याची इच्छा नाही

10 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या लोकांशी बोल. कदाचित्. ते लोक म्हणतील, ‘आम्ही पाप केले. नियम मोडले आमची पापे आम्हाला बोजा झाली आहेत. आमच्या पापांनी आम्ही सडलो आता जगण्यासाठी आम्ही काय करावे?’

11 “मी शपथपूर्वक सांगतो ‘दुष्टांचे मरण मी इच्छिले नव्हते. मला त्यांनी मरावे असे अजिबात वाटत नाही. त्या पापी लोकांनी परत माझ्याकडे यावे असे मला वाटते. त्यांनी आपला मार्ग बदलावा म्हणजे त्यांना खरोखरीचे जीवन जगता येईल. तेव्हा माझ्याकडे परत या. दुष्कृत्ये करायचे सोडा. इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही का मरावे?’ असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, असे तू त्या लोकांना सांगितले पाहिजेस.

12 “मानवपुत्रा, तू तुझ्या लोकांना असेही सांग ‘जर एखादा सज्जन कुमार्गाला लागून पाप करु लागला, तर त्याने पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी त्याला वाचवू शकणार नाहीत. तसेच एखादा पापापासून परावृत झाला, तर त्याची भूतकाळातील पापे त्याचा नाश करु शकणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा, पूर्वी केलेली सत्कृत्ये, आता तुम्ही दुष्कत्ये करु लागल्यास तुम्हाला वाचविणार नाहीत.’

13 “कदाचित् मी सज्जन माणसाला ‘तो जगेल’ असे सांगीन. पण त्यामुळे त्याला ‘आपण पूर्वी केलेली सत्कृत्ये आपल्याला वाचवतील असे वाटेल. म्हणून तो पाप करु लागेल, तर त्याची पूर्वीची सत्कृत्ये मी स्मरणार नाही. तो पाप करु लागल्याने तो मरेल.’

14 “किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल. 15 त्याने कर्ज देताना गहाण म्हणून ठेवून घेतलेल्या वस्तू तो कदाचित परत करेल. त्याने चोरलेल्या वस्तूंची किंमत तो चुकती करील. जीवनातील नियमाप्रमाणे तो चालू लागेल, तो वाईट गोष्टी करण्याचे सोडून देईल, तर तो नक्कीच जगेल. तो मरणार नाही. 16 त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. का? कारण आता तो योग्य रीतीने जगत आहे, तो प्रामाणिक झाला आहे. तेव्हा तो जगेल.

17 “पण तुझी माणसे म्हणतात, ‘हे योग्य नाही, परमेश्वर, माझा प्रभू, असा असूच शकत नाही.’

“पण ते लोक प्रामाणिक नाहीत. त्यांनी बदललेच पाहिजे. 18 जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल. 19 आणि जर दुष्टाने पाप करण्याचे सोडून दिले, तो चांगले जीवन जगू लागला, प्रामाणिक झाला, तर तो जगेल. 20 पण मी न्यायी नाही असे तुम्ही अजूनही म्हणता. पण मी तुम्हाला सत्य सांगत आहे. इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येकाच्या कर्मांचा मी न्याय करीन.”

यरुशलेम काबीज केले जाते

21 परागंदा अवस्थेच्या बाराच्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या (जानेवारी महिन्याच्या) पाचव्या दिवशी यरुशलेममधून एक माणूस माझ्याकडे आला. तो तेथील लढाईतून निसटून आला होता. तो म्हणाला, “नगरी (यरुशलेम) काबीज केली गेली.”

22 तो माणूस येण्यापूर्वीच्या संध्याकाळी परमेश्वराचे, माझ्या प्रभूचे, सामर्थ्य माझ्यावर आले. देवाने मला मुके केले. पण तो माणूस येण्याच्या वेळी परमेश्वराने मला वाचा दिली व बोलण्यास प्रवृत्त केले. 23 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 24 “मानवपुत्रा, इस्राएलच्या विद्ध्वंस झालेल्या गावांतून इस्राएली राहात आहेत. ते म्हणतात, ‘अब्राहाम एकटा असताना देवाने त्याला ही सर्व भूमी दिली. आता, आम्ही पुष्कळ आहोत आणि ही भूमी नक्कीच आमची आहे. ही आमच्या मालकीची आहे.’

25 “तू त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही मदतीकरिता तुमच्या मूर्तीकडे पाहता. तुम्ही लोकांचे खून करता. मग मी तुम्हाला ही भूमी का द्यावी? 26 तुम्ही तुमच्या स्वतःच्या तलवारीवर अवलंबून राहता. तुमच्यातील प्रत्येकजण भयानक कृत्ये करतो. शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करुन पाप करतो, तेव्हा तुम्हाला भूमी मिळू शकत नाही.’

27 “‘तू त्यांना सांगितले पाहिजेस की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझी शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की त्या नाश झालेल्या गावांत राहणारे लोक तलवारीने मारले जातील. जर एखादा शेतांत असेल. तर मी त्याला प्राण्याकडून मारीन व त्या प्राण्याचे तो भक्ष्य होईल. जर लोक गडात वा गुहेत लपले असतील, तर ते रोगराईने मरतील. 28 मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन. त्या देशाला अभिमानास्पद असणाऱ्या सर्व गोष्टी गमवाव्या लागतील. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही. 29 त्या लोकांनी खूप भयानक कृत्ये केली आहेत. म्हणून मी ती भूमी एक निर्जन, ओसाड प्रदेश करीन. मग ह्या लोकांना कळेल की मीच परमेश्वर आहे.”

30 “‘आणि, मानवपुत्रा, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या दारांत उभे राहून, तुझ्याबद्दल बोलतात, ते एकमेकांना म्हणतात “चला, परमेश्वर काय म्हणतो ते जाऊन ऐकू या.” 31 म्हणून ते माझे लोक असल्यासारखे तुझ्याकडे येतात. ते माझे लोक असल्याप्रमाणे ते करणार नाहीत. ते त्यांना भावते तेच करु इच्छितात. ते लोकांना फसवून खूप पैसा मिळवू बघतात.

32 “‘तू त्यांच्या दृष्टीने प्रेमगीते गाणारा फक्त एक गायक आहेस. तुझा गळा गोड आहे. तू तुझे वाद्य उत्तम वाजवितोस. ते तुझे फक्त ऐकतात पण त्याप्रमाणे ते करणार नाहीत. 33 पण तू गात असलेल्या गोष्टी खरोखरच घडतील. मगच लोकांना कळेल की त्यांच्यामध्ये खरोखरच एक संदेष्टा राहात होता.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes