A A A A A
Bible Book List

यहेज्केल 13 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

13 त्यानंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या संदेष्ट्यांशी बोल. ते संदेष्टे खरे म्हणजे माझ्यावतीने बोलत नसून त्यांना पाहिजे ते सांगतात म्हणून तू त्यांच्याशी बोल. त्यांना पुढील गोष्टी सांग. ‘परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की दुष्ट संदेष्ट्यांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही दृष्टान्तांत पाहिलेल्या गोष्टी लोकांना न सांगता, तुमच्या मनाचेच सांगता.

“‘इस्राएल, ओसाड, पडक्या वास्तूंतून धावणाऱ्या कोल्ह्यांप्रमाणे तुझे संदेष्टे असतील. नगरीच्या तटबंदीच्या भगदाडांजवळ तू सैनिक ठेवले नाहीस वा इस्राएलवासीयांच्या रक्षणासाठी भिंतही बांधली नाहीस. तेव्हा परमेश्वराने तुला शिक्षा करायची वेळ येताच, तू युद्धात हरशील.

“‘खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.

“‘खोट्या संदेष्ट्यांनो, तुम्ही पाहिलेले दुष्टान्त खरे नाहीत. तुम्ही जादू केली व असे घडेल म्हणून सांगितले. पण तुम्ही खोटे बोललात, परमेश्वराने असे सांगितले असे तुम्ही म्हणालात. पण मी तुमच्याशी बोललोच नाही.’”

पण आता परमेश्वर, माझ्या प्रभु, खरोखरच बोलेल. तो म्हणतो, “तुम्ही खोट्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही खोटे दुष्टान्त पाहिले. म्हणून मी (देव) तुमच्याविरुद्ध आहे.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, असे म्हटले. परमेश्वर म्हणतो, “खोटे दृष्टान्त पाहणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन. माझ्या लोकांतून मी त्यांना बाजूला काढीन. इस्राएलच्या वंशजांच्या नामावळीत त्यांची नावे असणार नाहीत. ते इस्राएलच्या भूमीत परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.

10 “ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात. 11 मी त्यांच्यावर गारांचा वर्षांव करीन आणि मुसळधार पाऊस (शत्रू-सैन्य) पाडीन, असे तू त्यांना सांग. जोराचे वारे वाहतील आणि तुफान येईल. मग तटबंदी पडेल. 12 भिंत पडेल आणि लोक संदेष्ट्यांना विचारतील ‘तुम्ही गिलावा केला होता, त्याचे काय झाले?’” 13 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुमच्यावर रागावलो आहे म्हणून मी वादळ उत्पन्न करीन, मुसळधार पाऊस पाडीन, गारांचा वर्षाव करीन आणि तुमचा संपूर्ण नाश करीन. 14 तुम्ही भिंतीला गिलावा करता. पण संपूर्ण तटबंदीच मी उद्ध्वस्त करीन. ती मी जमीनदोस्त करीन. ती तुमच्या अंगावर पडेल आणि मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे. 15 मी माझा सगळा राग त्या तटबंदीवर व तिच्यावर गिलावा देणाऱ्या लोकांवर ओतून टाकीन. मग मी म्हणेन ‘आता भिंतही नाही आणि तिच्यावर गिलावा करणारेही राहिले नाहीत.’

16 “ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.

17 देव म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल मधील स्त्री संदेष्ट्यांकडे पाहा. त्या माझ्यावतीने बोलत नाहीत. त्या त्यांच्या मनाचेच सांगतात. म्हणून तू माझ्यावतीने त्यांच्याविरुद्ध बोल. तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. 18 ‘परमेश्वर, माझा प्रभू, ह्या गोष्टी सांगतो. स्त्रियांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही कापडाच्या पटृ्या करुन लोकांना बांगड्यांप्रमाणे घालायला देता, डोक्याला बांधण्यासाठीही विशेष प्रकारचे पट्टे करुन देता. तुम्ही लोकांना सांगता की ह्या गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्याचे नियंत्रण करण्याची जादूची शक्ती आहे. स्वतःला जगविण्यासाठी तुम्ही लोकांना अशा रीतीने जाळ्यात पकडता! 19 तुम्ही मला लोकांच्यापुढे क्षुद्र बनविता. तुम्ही ओंजळभर सातू व भाकरीच्या काही तुकड्यांसाठी त्यांना माझ्याविरुद्ध फिरविता. माझ्या लोकांशी तुम्ही खोटे बोलता. त्या लोकांना खोटे आवडते. तुम्ही ज्यांनी जगायला पाहिजे त्यांना मारता आणि ज्यांनी मरायला पाहिजे, त्यांना जगविता. 20 म्हणून परमेश्वर, प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो, तुम्ही बांगड्यासारखे कापडी पट्टे करुन लोकांना सापळ्यात पकडू बघता पण मी त्यांना मुक्त करीन. तुमच्या हातातील ते कापडी पट्टे मी फाडून टाकीन, म्हणजे ते लोक पिंजऱ्यातून सोडून दिलेल्या पाखराप्रमाणे स्वतंत्र होतील. 21 मी डोक्याला बांधायचे पट्टे तोडीन आणि माझ्या माणसांना तुमच्या पकडीतून सोडवीन. तुमच्या सापळ्यातून ते निसटतील आणि मगच तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.

22 “‘तुमचे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. सज्जनांना त्याचा त्रास होतो. मला हे पंसत नाही. तुम्ही वाईट लोकांना पठिंबा देता, त्यांना उत्तेजन देता. त्यांना त्यांचे मार्ग बदलायला सांगत नाही. त्यांचे जीव वाचवायचा प्रयत्न करीत नाही. 23 तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes