A A A A A
Bible Book List

मत्तय 6 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

दान देण्याविषयी येशूची शिकवण

“जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.

“जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहीरपणे अशी कामे करतात, कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये. दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.

प्रार्थनेविषयी येशूची शिकवण

“जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.

“आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.

‘हे आमच्या स्वर्गातील पित्या,
    तुझे नाव पवित्र मानले जावो.
10 तुझे राज्य येवो,
    जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
11 आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.
12 जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो
    तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,
13 आम्हांला परीक्षेत आणू नकोस
    तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’

14 कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील; 15 पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.

उपासाविषयी येशूची शिकवण

16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. 17 तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. 18 यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.

पैशापेक्षा देव अधिक महत्त्वाचा आहे

19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21 जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

22 “डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. 23 पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.

24 “कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

देवाच्या राज्याला प्रथमस्थान द्या

25 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. 26 आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे. 27 आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?

28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत, 29 तरी मी तुम्हांला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर ऐश्र्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हता. 30 तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते, अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालणार नाही काय?

31 “चिंता करू नका आणि असे म्हणू नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ 32 सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. 33 तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील. 34 म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes