A A A A A
Bible Book List

मत्तय 24 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मंदिराचा भावी नाश

24 येशू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवायच्या होत्या. प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता. खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”

येशू जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले, ते म्हणाले, “आम्हांला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”

येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळा! कोणीही तुम्हांला फसवू नये मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील. तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. पण या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या कळांची सुरूवात अशा आहेत.

“लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुमचा छळ व्हावा आणि तुम्हांला जिवे मारावे यासाठी लोक तुम्हांला राज्यकर्त्याच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढवतील. 10 अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. 11 अनेक खोटे संदेष्टे येतील, ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील. 12 सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीति कमी कमी होत जाईल. 13 पण जो मनुष्य शेवटपर्यंत खंबीरपणे वागेल तोच तारला जाईल. 14 सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल.

15 “दानीएल संदेष्ट्याने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.) 16 “त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17 जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये. 18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.

19 “त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल. 20 जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21 कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.

22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.

23 “त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे,’ किंवा ‘तो तेथे आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.

26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ‘ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल. 28 जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

29 “छळानंतर लगेच, असे घडेल:

‘सूर्य अंधकारमय होईल
    व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील.
    आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’

30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. 31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

32 “अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हांला कळते. 33 मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याबाबतीतही असेच होईल जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. 34 मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. 35 सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.

ती वेळं कोनती अशेल ते फक्त देवालाच ठाउक

36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.

37 “नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. 38 महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यत लोक या गोष्टी करीत होते. 39 त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले.

“मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल. 40 दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 41 दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.

42 “म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे, 43 हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. 44 या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.

चांगला व वईट सेवक

45 “शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? 46 मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य! 47 मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.

48 “पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? 49 तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50 आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. 51 मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes