Add parallel Print Page Options

हेरोद येशूविषयी ऐकतो(A)

14 त्या वेळी हेरोदाने [a] येशूविषयी बातमी ऐकली. तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले. “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. त्यामुळेच तो हे चमत्कार करीत आहे.”

बाप्तिस्मा करणारा योहान कसा मारला गेला

हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते. कारण योहान त्याला सांगत होता, “तू होरोदियाला ठेवणे योग्य नाही.” हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.

हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारीत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “मला तेथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.”

हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावे अशी आज्ञा केली. 10 आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर तोडले. 11 मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. 12 मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले, आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.

येशू पाच हजारांहून अधिक लोकांना जेवू घालतो(B)

13 मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले. 14 मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.

15 मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”

16 परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”

17 तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”

18 तो म्हणाला, “त्या इकडे आणा.” 19 मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या. 20 ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या. 21 स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरूष मात्र पाच हजार होते.

येशू सरोवरावरून चालातो(C)

22 स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले. 23 लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. 24 पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.

25 मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला. 26 शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.

27 पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.

28 पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.

29 येशू म्हणाला, “ये.”

मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”

31 आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”

32 मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला. 33 तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

येशू रोग्यानां बरे करीतो(D)

34 नंतर ते पलीकडे गनेसरेत येथे पोहोचले. 35 तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. 36 आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

Footnotes

  1. मत्तय 14:1 हेरोद हेरोद अन्तीपास. महान हेरोदाचा मुलगा.