A A A A A
Bible Book List

प्रेषितांचीं कृत्यें 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

पेत्र एका लंगड्या मनुष्याला बरे करतो

एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.

पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!” त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले; त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”

मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली. तो माणूस उडी मारुन उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 9-10 सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुति करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते.

पेत्र लोकांच्या पुढे भाषण करतो

11 तो लंगडा मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण तो मनुष्य बरा झाला होता. ते पेत्र व योहान उभे असलेल्या शलमोनाच्या द्वारमंडपाकडे [a] धावत येऊ लागले.

12 जेव्हा पेत्राने हे पाहिले, तो लोकांना म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हांला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहात आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हांला असे वाटते का की, आमच्या चांगुलपणामुळे असे घडले? 13 नाही! देवाने हे केले! तो अब्राहामाचा देव आहे, इसहाकाचा देव आहे आणि तो याकोबाचा देव आहे, आमच्या पूर्वजांचा तो देव आहे. त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला. परंतु तुम्ही येशूला मारण्यासाठी दिले.पिलाताने येशूला मुक्त करण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही पिलाताला सांगितले की, तुम्हांला येशू नको. 14 येशू शुद्ध आणि चांगला (निष्पाप) होता. परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको, तुम्ही पिलाताला सांगितले की येशूऐवजी आम्हांला एक खुनी दे. 15 आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले! परंतु देवाने त्याला मरणातून उठविले, आम्ही त्याचे साक्षी आहो. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले.

16 “येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला. आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले. तुम्ही या मनुष्याल पाहू शकता. आणि तुम्ही त्याला ओळखता. येशूवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला. तुम्ही हे घडलेले पाहिले!

17 “माझ्या बंधूनो, तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजाणता केले. (तुम्हांला समजत नव्हते, तुम्ही काय करीत आहात. तुमच्या नेत्यांनासुद्धा हे समजले नाही.) 18 देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की, त्याचा ख्रिस्त दु:खसहन करील व मरेल. मी तुम्हांला सांगितलेले आहे की, देवाने हे कसे घडवून आणले. 19 म्हणून तुम्ही तुमची ह्रदये व जीवने बदलली पाहिजेत! देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. 20 मग प्रभु (देव) तुम्हांला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल, ज्याला त्याने ख्रिस्त म्हणून निवडले.

21 “परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे. 22 मोशे म्हणाला, ‘प्रभु तुमचा देव तुम्हांला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वतःच्या (यहूदी लोकांच्या) मधूनच देईल. [b] तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हांला सांगेल ते सारे तुम्ही पाळा. 23 जो कोणी संदेष्ट्याची (भविष्यवादी) आज्ञा पाळणार नाही, त्याचे आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल.’

24 “शमुवेल व इतर संदेष्टे (भविष्यावादी) जे शमुवेलानंतर झाले, जे देवासाठी बोलले, ते या आताच्या काळाविषयी बोलले. 25 संदेष्टे ज्या गोष्टीविषयी बोलले, त्या गोष्टी तुम्हांला मिळाल्या आहेत. देवाने तुमच्या वाडवडिलांशी (पूर्वजांशी) जो करार केला तो तुम्हांला मिळाला आहे. देवाने तुमचा पिता अब्राहाम याला म्हटले, ‘तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील. [c] 26 देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले, तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हांला परावृत करण्याकडून.’ तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले.”

Footnotes:

  1. प्रेषितांचीं कृत्यें 3:11 शलमोनाचा द्वारमंडप मंदिराचा पूर्वेकडील भाग, तो छपराने आच्छादित होता.
  2. प्रेषितांचीं कृत्यें 3:22 पहा अनुवाद 18:15,19
  3. प्रेषितांचीं कृत्यें 3:25 पहा उत्पत्ति 22:18, 26:24
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes