A A A A A
Bible Book List

प्रेषितांचीं कृत्यें 26 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

राजा अग्रिप्पापुढे पौल

26 अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करुन आपल्या बचावाचे भाषण सुरु केले: “अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण मला आपल्यासमोर माइयाविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधि आज मिळाली. विशेषतः यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल. तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंति करतो.

“मी माझे जीवन तरुणपणापासून माइया प्रांतात व यरुशलेमात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांना चांगले माहीत आहे. ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात. आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परुशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील. आता मी आमच्या वाडवडिलांना देवाने जे वचन दिले होते, त्याच्या आशेकरिता माझा न्याय व्हावा याशाठी येथे उभा आहे. आपल्या देवाची रात्रंदिवस कळकळीने उपासना करीत असताना हे जे वचन देवाने दिले ते पुरे होण्याची आशा आमच्या बाराही वंशाना वाटत आहे. या आशेमुळेच महाराज, यहूदी लोक माझ्यावर दोषारोप करीत आहेत. देव मेलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास न ठेवण्यासारखे का वाटावे.

“नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते. 10 आणि नेमके हेच मी यरुशलेम येथे केले. कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता. म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले, आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले. 11 अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली. आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरिता इतर शहरांमध्ये देखील जात असे.

येशूचे दर्शन झाल्याचे पौल सांगतो

12 “एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज, 13 वाटेत भर दुपारच्या वेळी मी माइया व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. 14 आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि हिब्रू भाषेत माइयाशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणुकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे,’

15 “आणि मी म्हणालो, ‘प्रभु, तू कोण आहेस?’

“प्रभूने उत्तर दिले, ‘मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस. 16 पण ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे: तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. 17 मी तुझी यहूदी व यहूदीतर विदेशी यांच्यापासून सुटका करीन. आणि यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठवीन. 18 यासाठी की, त्यांचे डोळे उघडावे व याविषयीचे सत्य काय आहे हे तू लोकांना दाखवून द्यावेस व त्यामुळे त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळेल आणि माइयामध्ये विश्वासामुळे पवित्र झालेल्या लोकांमध्ये जागा मिळेल.’”

पौल त्याच्या कामाविषयी सांगतो

19 यासाठी, “अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टान्त झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरुशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुद्धा प्रभुच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.

21 “या कारणांमुळे मी मंदिरात असताना यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. 22 जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. 23 त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दु:ख सहन करील. आणि मेलेल्यांतून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.”

पौल अग्रिप्पाचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो

24 पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्याला मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे!”

25 पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. 26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे, आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. 27 अग्रिप्पा महाराज, भविष्यावाद्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.”

28 यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”

29 पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंति आहे.”

30 यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले. 31 ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते. ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.” 32 अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes