A A A A A
Bible Book List

प्रेषितांचीं कृत्यें 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

लूक दुसरे पुस्तक लिहितो

प्रिय थियफिलस,

येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले. येशूच्या सुरुवातीपासून ते, तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले. हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित [a] निवडले होते त्यांच्याशी तो बोलला. येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या. हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते. परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की, तो जिवंत आहे. येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्ये करुन दाखवून हे सिद्ध केले. मरणातून उठविले गेल्यानंतर चाळीस दिवसांपर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले. येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला. एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की, यरुशलेम सोडू नका. येशू म्हणाला, “पित्याने तुम्हांला अभिवचत दिले आहे; मी तुम्हांला त्याविषची पूर्वी सांगितले होते. येथे (यरुशलेमात) त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पाहा. योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा [b] केला. परंतु थोड्याच दिवसांत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने [c] होईल.”

येशू वर स्वर्गात घेतला जातो

सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात यहूदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय?”

येशू त्यांना म्हणाला, “केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. ह्या गोष्टीची माहिती असणे तुम्हा कडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हांला शक्ति मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माइयाविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहूदीया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.”

नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर, तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाआड गेला. आणि ते त्याला पाहू शकले नाहीत. 10 येशू दूर जात होता, आणि प्रषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परीधान केलेले दोन पुरुष (देवदूत) अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले. 11 आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले, “गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला (येशूला) जाताना तुम्ही पाहिलेत त्याच मार्गाने तो परत येईल.”

एक नवा प्रेषित निवडण्यात येतो

12 नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरुन यरुशलेमास परत गेले. (हा डोंगर यरुशलेमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.) 13 प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोट [d] म्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).

14 हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्राथेना करीत होते. काही स्त्रिया, मरीया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते.

15 काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली. (तेथे सुमारे 120 जण होते.) तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला, 16-17 “बंधुंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दावीदाकरवी बोलला ते, काहीतरी घडणे आवश्यक आहे. आपल्या गटातील एक जण जो यहूदा त्याच्याविषयी तो बोलत होता. ते असे की, यहूदा आपल्याबरोबर सेवा करीत होता. आत्मा म्हणाला की, येशूला धरुन देण्यासाठी यहूदा लोकांचे पुढारीपण करील.”

18 यहूदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्यात आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले. परंतु यहूदा आपल्या डोक्यावर पडला. त्याचे शरीर तुटले. व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. 19 यरुशलेम येथील सर्व लोकांना हे समजले. म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव हकलदमा असे ठेवले. त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ “रक्ताचे शेत” असा होता.

20 पेत्र म्हणाला, “स्तोत्रसांहितेत (यहूदाविषयी) असे लिहिले आहे:

‘त्याच्या जमिनीजवळ (मालमत्तेजवळ) लोक न जावोत;
    कोणीही तिच्यात वस्ती न करो!’

आणखी असे लिहिले आहे:

‘त्याचा कारभार दुसरा घेवो.’

21-22 “म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे. प्रभु येशू आपल्याबरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे, योहान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले त्या वेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकीच हा मनुष्य असला पाहिजे.”

23 प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले. एक जण योसेफ बर्सबा होता. (त्याचे उपनाव युस्त होते.) व दुसरा मत्थिया होता. 24-25 प्रेषितांनी प्रार्थना केली, “प्रभु, तू सर्वांची मने जाणतोस. या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहेस हे आम्हांला सांग. यहूदाने या सेवेकडे पाठ फिरवली. आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला.” 26 नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे (सोंगट्या) टाकले. फाशावरुन प्रभुला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले. म्हणून तो इतर अकरा शिष्यांसह प्रेषित झाला.

Footnotes:

  1. प्रेषितांचीं कृत्यें 1:2 प्रेषित येशूने आपल्यासाठी निवडलेले खास मदतनीस
  2. प्रेषितांचीं कृत्यें 1:5 बाप्तिस्मा ग्रीक शब्द याचा अर्थ बुडविणे, एखादी व्यक्ति किंवा वस्तु काही काळ पाण्याखाली बुडविणे.
  3. प्रेषितांचीं कृत्यें 1:5 पवित्र आत्मा याला देवाचा आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा व सांत्वन करणारा असे म्हणतात, तो देव व ख्रिस्त यांच्यासह देवाच्यासाठी जगातील लोकामंध्ये कार्य करतो.
  4. प्रेषितांचीं कृत्यें 1:13 झिलोट हा यहूदी लोकांमधील एक राजकीय गट होता.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes