A A A A A
Bible Book List

नीतिसूत्रे 7 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

शहाणपण (ज्ञान) तुला व्यभिचारापासून परावृत्त करेल

मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव. माझ्या आज्ञा आणि माझी शिकवण सदैव तुझ्याजवळ राहू दे. त्यांना तुझ्या बोटांभोवती बांध. तुझ्या हृदयावर ते कोरुन ठेव. शहाणपणाला बहिणीसारखे वागव. समजुतदारपणाला तुझ्या कुटुंबाचाच एक घटक बनव. नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील.

एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता. त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली. तेव्हा अंधार होत होता-सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती. 10 ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले. 11 तिला पापाची पर्वा नव्हती. तिला चांगल्या वाईटाची पर्वा नव्हती. ती कधीच घरी राहात नसे. 12 ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे. 13 तिने त्या तरुणाला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले. लाज न वाटता ती म्हणाली, 14 “आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे. 15 म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास. 16 मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत. 17 मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे. 18 चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ. 19 माझा नवरा दूर गेला आहे. तो व्यवसायासाठी बाहेरगावी गेला आहे. 20 त्याने दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे बरोबर घेतले आहेत. तो दोन आठवडे घरी येणार नाही.” [a]

21 त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला. 22 आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला. 23 तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही.

24 मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. 25 दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका. 26 तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे. 27 तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.

Footnotes:

  1. नीतिसूत्रे 7:20 तोदोन … येणार नाही आठवडे शब्दश तो पौणिमेपर्यंत घरी येणार नाही. सहभोजन अमावास्येला झाले असावे असे यावरुन दिसते. अमावस्या म्हणजे हिब्रू लोकांच्या महिन्याचा पहिला दिवस.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes