Add parallel Print Page Options

ज्ञानाचे ऐका

मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव. ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.

परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते. तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे. जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.

म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील. 10 ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.

11 ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल. 12 ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात. 13 त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत. 14 त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात. 15 त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.

16-17 ज्ञान तुला अनोळखी स्त्रीपासून वाचवील. दुसऱ्या देशातली एखादी स्त्री गोड शब्दांनी तुला तिच्याबरोबर पाप करायला प्रवृत्त करेल. त्या स्त्रीने तरुणपणी लग्न केले. पण तिने नवऱ्याला सोडले. तिने देवासमोर तिचे लग्नाचे वचन पाळले नाही. पण ज्ञान तुला तिला “नाही” म्हणायला मदत करील. 18 तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल. 19 ती उघड्या कबरेसारखी आहे. जे लोक तिच्याकडे आत जातात ते जीवनाला मुकतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत.

20 ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील. 21 चांगले प्रामाणिक लोक स्वतःच्या जमीनीवर राहातील. साधे प्रामाणिक लोक स्वतःची जमीन राखतील. 22 परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.