A A A A A
Bible Book List

निर्गम 19 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

इस्राएलशी देवाचा पवित्र करार

19 मिसरमधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायाच्या रानात पोहोंचले. ते लोक रफीदीम सोडून सीनायच्या रानात आले होते; त्यांनी होरेब म्हणजे सीनाय पर्वताजवळ आपला तळ दिला. मग मोशे पर्वतावर देवाला भेटावयास गेला तो पर्वतावर असताना देव त्याला म्हणाला, “तू या इस्राएल लोकांना म्हणजे याकोबाच्या वंशजांना सांग, ‘मी माझ्या शत्रुंचे काय करतो ते तुम्ही पाहिले आहे. मिसरच्या लोकांचे मी काय केले आहे आणि गरुड पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी जसा नेतो तसेच मिसरच्या लोकांच्या तावडीतून सुरक्षितपणे तुम्हाला येथे आणले तेही तुम्ही पाहिले आहे. म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल. तुम्ही एक पवित्र राष्ट्र-याजक लोकांचे राज्य व्हाल’ या सर्व गोष्टी, मोशे, तू इस्राएल लोकांस सांग.”

तेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला, व त्याने इस्राएल मधील वडिलधाऱ्या माणसांना म्हणजे पुढाऱ्यांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या; आणि सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले; ते म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”

मग मोशे पुन्हा पर्वतावर देवाला भेटावयास गेला आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील असे त्याने देवाला सांगितले. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व इस्राएल लोकांना ऐकू जाईल; मी हे ह्यासाठी करीन की त्यामुळे तू सांगितलेल्या सर्व गोष्टीवर ते नेहमी विश्वास ठेवतील.”

मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.

10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “आज आणि उद्या माझ्या विशेष भेटीसाठी लोकांना पवित्र कर; त्यांनी कपडे स्वच्छ धुवावेत. 11 व तिसऱ्या दिवशी माझ्या भेटीसाठी तयार राहावे कारण तिसऱ्या दिवशी परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल आणि सर्व लोक मला पाहतील. मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. 12-13 परंतु लोकांना पर्वतापासून दूर राहाण्यास तू सांग; तेथे तू एक सीमारेषा काढ आणि लोकांनी ती ओलांडू नये असे तू त्यांना बजावून सांग; जर कोणा माणसाचा किंवा जनावराचा पर्वताला स्पर्श झाला तर त्याला दगडाने किंवा बाणाने मारून टाकावे. परंतु त्याला कोणीही स्पर्श करु नये. शिंगाचा आवाज ऐकू येईपर्यंत लोकांनी थांबावे. तो आवाज ऐकल्यावर ते पर्वत चढून जाऊ शकतील.”

14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.

15 मग मोशे लोकांना म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तो पर्यंत पुरुषांनी स्त्रियांना स्पर्श करु नये.”

16 तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले. 17 नंतर मोशेने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाला भेटावयास पर्वताजवळच्या जागी नेले. 18 सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उतरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला. 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. मोशे देवाबरोबर जेंव्हा जेंव्हा बोलला तेंव्हा तेंव्हा देवाने त्याला मेघगर्जनेसारख्या आवाजाने उत्तर दिले.

20 याप्रमाणे परमेश्वर स्वर्गातून सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरला आणि त्याने मोशेला बोलावून आपल्या बरोबर पर्वताच्या शिखरावर येण्यास सांगितले. तेव्हा मोशे पर्वतावर गेला.

21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी माझ्याजवळ येऊ नये व माझ्याकडे बघू नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील. 22 तसेच याजक लोकांनाही सांग की माझ्या भेटीस माझ्याजवळ येताना आपणांस पवित्र करून यावे; तसे केले नाही तर मी त्यांना शिक्षा करीन.”

23 मोशेन परमेश्वराला सांगितले, “परंतु लोक पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तू स्वतः आम्हाला एक सीमारेषा आखावयास व लोकांनी ती रेषा ओलाडूंन पवित्र भूमिवर येऊ नये असे सांगितलेस.”

24 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांना इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”

25 तेव्हा मोशे लोकांकडे खाली गेला व त्याने त्यांना या गोष्टी सांगितल्या.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes