A A A A A
Bible Book List

निर्गम 15 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

मोशेचे गीत

15 नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले:

“मी परमेश्वराला गीत गाईन
    कारण त्याने महान कृत्ये केली आहेत;
घोडा व स्वार यांना
    त्याने समुद्रात फेकून दिले आहे.
परमेश्वर माझे सामर्थ्य आहे.
    तो माझे रक्षण करितो.
    मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [a]
परमेश्वर माझा देव आहे;
    तो माझ्या पूर्वजाचा देव आहे;
मी त्याचे गौरव करीन.
परमेश्वर महान योद्धा आहे;
    त्याचे नांव याव्हे आहे.
त्याने फारोचे रथ व स्वार यांना
    समुद्रात फेकून दिले;
त्याने फारोचे उत्तम लष्करी
    अधिकारी तांबड्या समुद्रात बुडविले.
खोल पाण्याने त्यांना बुडविले;
    ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.

“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
    त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून
    उठणाऱ्यांचा नाश करतोस;
अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे
    तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने
    पाणी राशी सारखे उंच उभे राहिले
व जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली;
    समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.

“शत्रु म्हणाला,
    ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन,
मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
    माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन;
    माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वतः करिता घेईन.’
10 परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायु सोडलास
    आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल
    पाण्यात तळापर्यंत बुडाले.

11 “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का?
    नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही;
    तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस!
    तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे!
    तू महान चमत्कार करतोस!
12 तू तुझा उजवा हात उगारला पृथ्वीने
    त्यांना गिळून टाकले.
13 तू उद्धारिलेल्या लोकांना
    तू तुझ्या दयाळूपणाने चालविले आहेस;
तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र
    आणि आनंददायी प्रदेशात नेले आहेस.

14 “इतर राष्ट्रे ही गोष्ट
    ऐकून भयभीत होतील;
    पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.
15 मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक
    भीतीने थरथरा कांपतील
    आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
    आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
ते तुझ्या लोकांना काहीही न करता,
    दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
17 तू तुझ्या लोकांना
    तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
हे परमेश्वरा, तू त्यांना तुझ्या सिहांसनासाठी तयार केलेल्या ठिकाणाजवळ राहू देशील,
    व तू हे परमेश्वरा तू तुझे मंदिर बांधशील.

18 “परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”

19 फारोचे घोडे, घोडेस्वार व रथ समुद्रात गेले आणि परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.

20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

21 “परमेश्वराला गीत गा;
    कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
त्याने घोडा व घोडेस्वार यांना
    समुद्रात फेकून दिले आहे....”

22 मोशे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी मिळाले नाही. 23 तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नांवाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी होते परंतु ते फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, (म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले).

24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”

25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले.

त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांच्या विश्वासाची कसोटी घेतली. 26 परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा; ज्या गोष्टी चांगल्या आहेत असे तो म्हणतो त्या तुम्ही करा; जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळाल तर तुम्हाला मिसरच्या लोकांप्रमाणे पीडा भोगाव्या लागणार नाहीत आणि मी जो परमेश्वर त्या मी मिसरच्या लोकांवर जे रोग पाठवले ते तुम्हांवर पाठविणार नाही; मी परमेश्वर आहे; तुम्हाला बरे करणारा मीच आहे.”

27 मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणी गेले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.

Footnotes:

  1. निर्गम 15:2 परमेश्वर … गाईन शब्दश “याहवे माझे सामर्थ्य व स्तुति आहे आणि तोच माझे तारण आहे.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes