A A A A A
Bible Book List

गणना 21 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

कनानच्या लोकांबरोबर युद्ध

21 अरादचा कनानी राजा नेगेबमध्ये राहात होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांना कैद केले. नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरला खास वचन दिले: “परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हाला मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.”

परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांना कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.

पितळेचा साप

इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. त्यांनी मोशेविरुद्ध व देवविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “तू आम्हाला ह्या वाळवंटात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”

तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मेले. लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हाला माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक.” तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.

परमेश्वर मोशेला म्हणाला, “एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो माणूस मरणार नाही.” मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या माणसाने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.

मवाबाचा प्रवास

10 इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले. 11 नंतर ओबोथ सोडून त्यांनी इये-आबारीमला मवाबाच्या पूर्वेकडे वाळवंटात तळ दिला. 12 तो सोडून ते जरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला. 13 ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती. 14 म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात त पुढील शब्द लिहिले आहेतः

“…आणि सुफातला वाहेब व आर्णोनची खोरी. 15 आणि आर व रस्त्यांपर्यंतचे दऱ्यांजवळचे डोंगर हे प्रदेश मवाबच्या सरहद्दीवर आहेत.”

16 इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला व ते बएर [a] येथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. व मी त्यांना इथे पाणी देईन.” 17 नंतर इस्राएलचे लोक हे गाणे गाऊ लागले:

“विहिरींनो पाण्याने भरून जा.
    त्या संबंधी गाणे गा.
18 महान लोकांनी ही विहीर खणली.
त्यांनी ही विहीर त्यांच्या राजदंडानी व काठ्यांनी खणली,
    ही वाळवंटातील भेट [b] आहे.”

म्हणून लोकांनी त्या विहिर असलेल्या प्रदेशाला “मत्ताम” म्हटले.

19 लोक मत्तानहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथला गेले. 20 लोक बामोथहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. (पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते)

सिहोन आणि ओग

21 इस्राएल लोकांनी काही माणसे आमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,

22 “आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कुठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कुठल्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”

23 पण सिहोन राजाने इस्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो वाळवंटाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.

24 पण इस्राएल लोकांनी राजाला मारले. नंतर त्यांनी अर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण आम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते. 25 इस्राएल लोकांनी सगळी अम्मोनी शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजुबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला. 26 हेशबोनमध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन रहात होता. पूर्वी सीहोनने मवाबच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता. 27 त्यावरुन गायक हे गाणे गातातः

“जा व हेशबोन पुन्हा बांधा
    सीहोनचे शहर भक्कम करा.
28 हेशबोनमधून आग निघाली आहे.
    आग सीहोनच्या शहरातून निघाली आहे.
त्या आगीत मवाबमधले आर शहर बेचिराख झाले.
    अर्णोन नदीच्या वरचे डोंगर आगीत जळाले.
29 मवाब, तुझ्या दृष्टीने हे वाईट आहे.
    कमोशचे लोक नष्ट झाले.
त्याची मुले पळून गेली.
    त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करुन पकडून नेले.
30 पण आम्ही अमोरी लोकांचा पराभव केला.
    आम्ही त्यांची शहरे उध्वस्त केली.
    हेशबोन पासून दीबोनपर्यंत नाशीम पासून मेदबाजवळच्या नोफापर्यंत.”

31 तेव्हा इस्राएल लोकांनी अमोरी लोकांच्या प्रदेशात तळ ठोकला.

32 मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांना पाठवले. मोशेने हे केल्यानंतर इस्राएल लोकांनी ते शहर जिंकले. त्यांनी त्या शहरालगतची छोटी शहरेही घेतली. जे अमोरी लोक तिथे रहात होते त्यांना इस्राएल लोकांनी तिथून जायला भाग पाडले.

33 नंतर इस्राएल लोक बाशानच्या रस्त्याला लागले. बाशानचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढण्यासाठी निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला.

34 पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या राजाची भीती बाळगू नकोस. मी तुला त्याचा पराभव करायची परवानगी देईन. तू त्याचे सगळे सैन्य व त्याचा सगळा प्रदेश घेशील. तू हेशबोनमध्ये राहाणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.”

35 म्हणून इस्राएल लोकांनी ओगचा व त्याच्या सैन्याचा पराभव केला. त्यांनी त्याला व त्याच्या मुलांना आणि त्याच्या सैन्याला मारून टाकले. इस्राएल लोकांनी त्याचा सर्व प्रदेश घेतला.

Footnotes:

  1. गणना 21:16 बएर या हिब्रू शब्दाचा अर्थ विहिर असा आहे.
  2. गणना 21:18 वाळवंटातील भेट हिब्रू भाषेत हा “माताना” शब्दाचा अर्थ आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes