A A A A A
Bible Book List

एस्तेर 1 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

राणी वश्तीचा आज्ञाभंग

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता. शूशन या राजधानीच्या नगरातून राजा अहश्वेरोश राज्य करीत असे.

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते. या मेजवान्या एकशेऐंशी दिवस चालल्या. या काळात राजा अहश्वेरोशने आपल्या राज्याच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले. आपल्या प्रासादाचे राजेशाही सौंदर्य आणि वैभव त्याने सर्वांना दाखवले. एकशेऐंशी दिवसांचा हा काळ संपल्यावर राजा अहश्वेरोशने आणखी एक मेजवानी दिली. ती सात दिवस चालली. राजवाडयाच्या अंतर्भागातील उद्यानात ही मेजवानी होती. तिथे शूशन या राजधानीच्या शहरातील समस्त लहान थोरांना आमंत्रित केले होते. या आतल्या उद्यानात अळशीच्या सुताचे पांढरे निळे शोभेचे पडदे खोलीभर टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया अळशीच्या दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभांना लावले होते. तेथील मंचक सोन्यारुपाचे असून जांभा, संगमरवर शिंप आणि इतर मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवलेले होते. सुवर्णपात्रांतून द्राक्षारस दिला होता. ही पात्रेही नानाविविध तऱ्हांची होती. राजा अतिशय उदार असल्यामुळे द्राक्षारस भरभरुन देण्यात आला. सर्व आमंत्रितांना मनसोक्त द्राक्षारस देण्यात यावा अशी राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती व सेवक राजाची आज्ञा पाळत होते.

राणी वश्ती हिनेही राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

10-11 मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मनः स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.

12 पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला. 13-14 पंडिताचा आणि ज्योतिष्यांचा सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. त्यानुसार कायदे जाणणाऱ्या पंडितांशी राजा बोलला. ही सुज्ञ मंडळी राजाला जवळची होती. त्यांची नावे अशी: कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि मेदय मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. 15 राजा ने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी कारण तिने राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तीचे उल्लंघन केले आहे.”

16 तेव्हा ममुखानाने सर्व अधिकाऱ्यांसमक्ष राजाला सांगितले, “राणी वश्तीच्या हातून प्रमाद घडलेला आहे. तिची ही गैरवर्तणूक केवळ राजाच्याच विरुध्द नव्हे तर राज्यातील सर्व सरदार व प्रजा यांच्याविरुध्द आहे. 17 माझे म्हणणे असे आहे की राणी वश्ती अशी वागली हे इतर सर्व बायकांना समजेल. त्या उद्या आपल्या नवऱ्यांचा शब्द डावलतील. त्या आपापल्या नवऱ्यांना म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणायला सांगितले पण तिने यायला नकार दिला.’

18 “राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे. त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल. त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप फैलावेल.

19 “तर राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो. राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यात काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि मेदय यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कुणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. 20 राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व बायका आपापल्या नवऱ्यांशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या बायका आपल्या नवऱ्याचा मान ठेवतील.”

21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली. 22 राजा अहश्वेरोशने सर्व राज्यभर खलिते पाठवले. प्रत्येक प्रांतात पाठवायचा खलिता त्या प्रांताच्या भाषेत होता. प्रत्येक राष्ट्राला तिथल्या भाषेत पत्र गेले. प्रत्येक पुरुषाची आपल्या घरात सत्ता चालावी असे त्या पत्रांमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिलेले होते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes