A A A A A
Bible Book List

उत्पत्ति 50 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

याकोबाची प्रेतक्रिया

50 इस्राएल मरण पावला तेव्हा योसेफ फार दु:खी झाला. तो आपल्या बापाला कवटाळून खूप रडला; त्याने बापाची चुंबने घेतली. योसेफाने आपल्या सेवाकांतील वैद्यांना आपल्या बापाचे प्रेत मसाला लावून, व भरुन तयार ठेण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरुन, पुरण्यासाठी तयार केले. अशा खास पद्धतीने प्रेत तयार केल्यानंतर ते पुरण्या पूर्वी मिसरचे लोक चाळीस दिवस थांबत असत. त्यांनतर मिसरच्या लोकांनी त्यांच्या रीतीप्रमाणे याकोबासाठी सत्तर दिवस शोक केला.

सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला. तेव्हा योसेफ फारोच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “फारोला हे सांगा, ‘माझा बाप मरावयास टेकला असताना मी त्याला वचन दिले होते की मी त्याला कनान देशातील त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या गुहेत पुरेन. तेव्हा कृपया माझ्या बापास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत आल्यावर तुम्हाला भेटेन.’”

फारोने उत्तर दिले, “तू आपल्या बापाला दिलेले वचन पूर्ण कर; तू जाऊन आपल्या बापाने सांगितल्या प्रमाणे त्याला पुरुन ये.”

तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला; तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले; आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. (फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.) तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणाही घोडयावर बसून मोठया संख्येने योसेफाबरोबर गेले.

10 ते यार्देन (जॉईन) नदीच्या पूर्वेस गोरेन आताद येथील खळ्यावर गेले. या ठिकाणी इस्राएलाचा प्रेतक्रिया विधी झाला. हा प्रेतक्रियेचा विधी सात दिवस चालला. 11 कनान देशात राहाणाऱ्या लोकांनी गोरेन आताद येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचे प्रेतक्रिया विधी व संस्कार फारच दु:खाने भरलेले आहेत.” त्यामुळे आता त्या जागेला अबेल मिस्राईम असे नाव पडले आहे.

12 अशाप्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या बापाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13 त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. 14 आपल्या बापाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्या बरोबर गेलेला सर्वसमुदाय मिसरला माघारी गेला.

योसेफाच्या भावांना योसेफाची भीती वाटते

15 याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरुन आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले कदाचित “योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” 16 तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणे प्रमाणे निरोप पाठवला. “तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली 17 तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत.”

योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दु:ख झाले व तो रडला. 18 योसेफाचे भाऊ त्यांजकडे गेले व ते त्याच्या पाया पडले, मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.”

19 मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; मी देव नाही, म्हणजे शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही! 20 तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आजही देवाची तीच योजना आहे. 21 तेव्हा भिऊ नका; मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” योसेफ त्याच्या भावांशी ममतेने बोलला त्यामुळे त्याच्या भावांना बरे वाटले.

22 योसेफ आपल्या बापाच्या कुटुंबीयासह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. 23 योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली.

योसेफाचे मरण

24 योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हाला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”

25 मग योसेफाने आपल्या वंशजास वचन देण्यास सांगितले. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हाला येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.”

26 योसेफ एकशेदहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते शवपेटीत मिसरमध्ये ठेवले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes