A A A A A
Bible Book List

ईयोब 6 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

ईयोब अलीफजला उत्तर देतो

नंतर ईयोबाने उत्तर दिले:

“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले
    तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.
माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे.
    म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते.
त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत.
    माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते.
    देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.
काहीही वाईट घडलेले नसते तेव्हा तुझे शब्द सहजपणे बोलता येतात.
    रानटी गाढवसुध्दा खायला गवत असले की कसली तक्रार करीत नाही.
    आणि गायसुध्दा तिला तिचा चारा मिळाला की मुकाट असते.
अन्न मिठाशिवाय चांगले लागत नाही
    आणि अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव नसते.
मी त्याला स्पर्शही करु शकत नाही.
    तसल्या बेचव अन्नाची मला शिसारी येते.
तुमचे शब्दही मला आता
    तसेच वाटायला लागले आहेत.

“मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते.
    मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते.
मला देवाच्या हातून मरण हवे.
    त्याने मला चिरडून टाकावे.
10 आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल,
    एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन,
    या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.

11 “माझी शक्ती आता संपली आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा माझ्यात नाही.
    माझे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही.
    त्यामुळे ज्याच्यासाठी धीर धरावा असे काही कारण उरलेले नाही.
12 मी पाषाणासारखा शक्तीमान नाही.
    माझे शरीर पितळेचे बनलेले नाही.
13 आता स्वतःला सावरायची ताकद माझ्यात नाही.
    का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.

14 “एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी
    आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे.
15 पण मित्रांनो, तुम्ही मात्र निष्ठावान नाही.
    मी तुमच्यावर विसंबून राहू शकत नाही.
    जे कधी वाहतात, कधी वाहात नाहीत अशा ओढ्यासारखे तुम्ही आहात. ओढे जेव्हा हिमाने आणि
16 वितळणाऱ्या बर्फाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात.
17 जेव्हा हवामान उष्ण आणि कोरडे होते
    तेव्हा पाणी वाहात नाही
    आणि ओढे नाहीसे होतात.
18 व्यापारी त्याची नागमोडी वळणे शोधत वाळवंटात जातात
    परंतु ते दिसेनासे झालेले असतात.
19 तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले.
    शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला.
20 त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती
    परंतु त्यांची निराशा झाली.
21 आता तुम्ही त्या ओढ्यासारखे आहात.
    तुम्ही माझ्या संकटांना पाहून घाबरता.
22 मी तुम्हाला मदत मागितली का?
    नाही. पण तुम्ही आपणहून मला उपदेश केला.
23 ‘माझे शत्रूपासून रक्षण करा!
    क्रूर लोकांपासून मला वाचवा!’
    असे मी तुम्हाला म्हटले का?

24 “आता तुम्ही मला शिकवा म्हणजे मी शांत होईन.
    माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25 प्रामाणिक शब्द नेहमीच सामर्थ्यशाली असतात.
    परंतु तुमचे वादविवाद काहीच सिध्द करु शकत नाहीत.
26 माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का?
    तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
27 पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी
    तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात.
    तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.
28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा.
    मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही.
29 तुम्ही आता तुमचा विचार बदला, अन्यायी होऊ नका.
    पुन्हा विचार करा.
    मी काहीही चूक केलेली नाही.
30 मी खोटे बोलत नाही
    आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes