A A A A A
Bible Book List

इब्री लोकांस 6 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याविषयीची [a] शिकवण, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचा न्यायनिवाडा, देवावरील विश्र्वास, आपल्या निर्जीव गतजीवनाचा पश्चाताप या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. आणि जर देवाची इच्छा असेल तर आपण पूर्ण ख्रिस्तीपणापर्यंत जाऊ.

4-6 ज्यांना स्वर्गीय दानांचा अनुभव आलेला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, त्यांना पुन्हा पश्चात्तापाकडे नेणे अशक्य आहे. तसेच देवाच्या वचनाची गोडी अनुभवली आहे, व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याचा अनुभव आहे आणि त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळविणे अशक्य आहे, कारण त्याच्या स्वतःच्या हानीकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्याला आणतात.

जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो. पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.

बंधूंजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हांला अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल. 10 कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही. 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी. 12 आम्हांला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.

13 जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली. 14 तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन.” 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.

16 लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते. 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली. 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.

19 आम्हांला ही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते, 20 जेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.

Footnotes:

  1. इब्री लोकांस 6:1 बाप्तिस्मा या ठिकाणी याचे दोन अर्थ होऊ शकतात. दोन्हीपैकी एक (1) याचा ख्रिस्ती बाप्तिस्मा (काही रितापाण्यात बुडविणे) किंवा (2) यहूदी विधिपूर्वक धुण्याची पद्धत.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center

  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes